"सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल", एकनाथ शिंदेंचे एका दगडात तीन पक्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 07:52 PM2023-09-03T19:52:05+5:302023-09-03T19:53:12+5:30

Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका विधानानं वाद चिघळला आहे.

Chief Minister Eknath Shinde has criticized Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin citing his statement of ending Sanatan Dharma and also criticized Uddhav Thackeray | "सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल", एकनाथ शिंदेंचे एका दगडात तीन पक्षी

"सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल", एकनाथ शिंदेंचे एका दगडात तीन पक्षी

googlenewsNext

मुंबई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका विधानानं वाद चिघळला आहे. सनातन धर्म मिटवा म्हणणाऱ्या उदयनिधी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून सडकून टीका केली आहे. "तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसच्या चिदंबरम यांचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा चिदंबरमने केली आहे", असे एकनाथ शिंदेंनी म्हटले. 

उदयनिधी स्टॅलिन यांचा समाचार घेताना शिंदे म्हणाले की, हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडिया’ आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. काँग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे. 

उद्धव ठाकरेंचा घेतला समाचार 
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतेय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडिया’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेंचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनी सुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे, अशी टीका शिंदेंनी केली. 

इंडिया आघाडीवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले, "आज इंडिया आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी."

उदयनिधी यांच्या विधानानं वाद 
दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना मच्छर, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासोबत केल्याने वादाला तोंड फुटले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे.  

Web Title: Chief Minister Eknath Shinde has criticized Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin citing his statement of ending Sanatan Dharma and also criticized Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.