भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याबद्दल ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे अभिनंदन - एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 01:26 PM2024-02-03T13:26:10+5:302024-02-03T13:27:32+5:30
PM Modi announces Bharat Ratna for Lal Krishna Advani: लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे.
Lalkrushan Advani Bharat Ratna 2024 (Marathi News): भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मंडळी अडवाणींचे अभिनंदन करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडवाणी यांना भारतरत्न (Bharat Ratna Award) जाहीर झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले. अलीकडेच केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याचा निर्णय घेतला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "सर्वसामान्य नागरिकांचे कल्याण, विकासाचा ध्यास आणि प्रखर हिंदुत्वाचा विचार अंगिकारत राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अयोध्येत श्री रामाचे भव्य मंदिर उभे राहावे या विचाराने रथयात्रा काढून आडवाणी यांनी जनजागृती केली. अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यावर आडवाणींच्या योगदानाचे स्मरण ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार जाहीर केला, हे आपल्या भारतीय संस्काराचे द्योतक म्हणावे लागेल."
सर्वसामान्य नागरिकांचे कल्याण, विकासाचा ध्यास आणि प्रखर हिंदुत्वाचा विचार अंगिकारत राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व लालकृष्ण आडवाणी जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 3, 2024
तसेच आणीबाणी आणि त्यानंतर ढवळून निघालेल्या राजकीय पटलावर जनसंघ आणि भाजपच्या माध्यमातून देशहिताचा विचार मांडत राहून त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका कायम चोख निभावली. उपपंतप्रधान म्हणून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहणार आहे. राजकारणातील तरुण पिढीसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावणाऱ्या आडवाणी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मैत्रीही अनोखी होती. हिंदुत्वाचा विचार आणि श्री रामाचा ध्यास असलेली ही दोन व्यक्तिमत्वे सकारात्मक राजकीय साथीदार होते. भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याबद्दल या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना प्रणाम, असेही शिंदेंनी नमूद केले.
दरम्यान, देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही अभिनंदन करण्यात येत आहे. लालकृष्ण अडवाणी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून पक्षाच्या बांधनीत त्यांचा मोठा हात आहे.