मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, "लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 02:46 PM2022-08-06T14:46:36+5:302022-08-06T14:47:48+5:30
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पोहोचले आहेत. यावेळी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
नवी दिल्ली : राज्यात नवे सरकार अस्तित्वात येऊन अनेक दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? तसेच, मंत्रिमंडळात भाजप आणि शिंदे गटातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच, मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विरोधकांकडून सुद्धा नव्या सरकारवर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पोहोचले आहेत. यावेळी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शनिवारी एकनाथ शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी शासकीय कामांच्या बैठकांसाठी मी दिल्लीत आलो आहे. दिल्ली दौऱ्याचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काही संबंध नाही. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक बैठक आयोजीत केली आहे. त्या बैठकील मी उपस्थित राहणार आहे. तसेच, उद्या निती आयोगाची बैठक होणार आहे. या दोन्ही बैठकांसाठी मी दिल्लीत आलो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
याचबरोबर, प्रसारमाध्यमांनी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारला. यावेळी, लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा नाही. खात्यांची जबाबदारी सचिवांकडे दिली आहे. कोणत्याही खात्याचे काम थांबवले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पोहोचले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीच दिल्लीत दाखल झाले आहेत. काही शासकीय कामांसाठी या दोघांचा दिल्ली दौरा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबतही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असा अंदाज बांधण्यात येत आहे. दरम्यान, शिंदे-भाजप सरकार स्थापन होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यावरुन सरकारवर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे.