मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 02:10 PM2022-07-21T14:10:01+5:302022-07-21T14:10:37+5:30
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या खासदारांपैकी एक असलेले शिवसेनेचे मुंबईतील ज्येष्ठ नेते आणि खासदार Gajanan Kirtikar यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे. गजानन कीर्तिकर हे आजारी असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई - एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शिवसेनेच्या ४० आमदारांनंतर १२ खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच अनेक शहरातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारीही शिंदेंना पाठिंबा देत आहेत. दरम्यान, आतापर्यंत उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या खासदारांपैकी एक असलेले शिवसेनेचे मुंबईतील ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे. गजानन कीर्तिकर हे आजारी असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची चिंता वाढली असून, मुंबईतील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आले होते. तसेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, विधानसभेत शिंदेगटाकडे दोन तृतियांशहून अधिक खासदार गेल्याने शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात फूट दिसून आली. दुसरीकडे शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला होता.
दरम्यान, आता ठाकरेंसोबत असलेले ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्याने मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे ही भेट आजारी असलेल्या कीर्तिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घेण्यात आलेली सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र एकीकडे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना कडाडून विरोध करताना कीर्तिकर आणि शिंदे यांची भेट झाल्याने शिंदे गटात जाणारा शिवसेनेचा तेरावा खासदार हे कीर्तिकर ठरणार का? याची चर्चा रंगली आहे.