गाडीतूनच मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन; हिंगोली पुराचा आढावा घेत दिले 'हे' निर्देश!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 01:30 PM2022-07-09T13:30:20+5:302022-07-09T13:31:24+5:30
Chief Minister Eknath Shinde : नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधून घेतला.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये ते भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधून घेतला.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे येथील कुरुंदा गाव संपूर्ण पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब समजताच त्यांनी गाडीतूनच स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच, पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. याशिवाय, काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे, असेही निर्देश त्यांना दिले.
मुख्यमंत्री @mieknathshinde हे दिल्ली दौऱ्यावर असून #हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला आलेल्या पूराबाबतच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे घेतली.पूरग्रस्तांची सर्व व्यवस्था करावी तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही यास प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. pic.twitter.com/nUEbPkqr0x
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 9, 2022
हिंगोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात आज सकाळी आठ वाजेपर्यंत ६६.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, आंबा, गिरगाव, कुरुंदा या सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, कुरुंदा येथे शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पाणी घुसले असून हजारो घरांचे नुकसान झाले आहे. गुरे वाहून गेली, वाहने वाहून गेली तर गाव सकाळी सात वाजेपर्यंत पाण्याखालीच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. २०१६ मध्ये कुरुंदा गाव पाण्याखाली गेले होते, तेव्हाही करोडो रुपयांची हानी झाली होती. यावेळीही तशीच परिस्थिती उद्भवली आहे.
मिळेल तेथे घेतला आश्रय
कुरुंदा गावात रात्री दोन वाजेपासून पुराचे थैमान सुरू होते, जिकडे तिकडे हाहाकार पसरला होता. एक मजली घर असलेल्यांना जीव वाचवायचा कसा? असा प्रश्न पडला होता, घरात पाणी घुसले रस्त्यावर वेगाने पाणी वाहत होते. त्यामुळे कोणी शेजाऱ्याकडे दुसऱ्या मजल्यावर आसरा घेतला. तर काहींनी उंच भागातील शाळा ग्रामपंचायत इमारत आधी ठिकाणी आश्रय घेतल्याचे चित्र आहे.