मुख्यमंत्री रजेवर की कामावर? CM कार्यालयाकडून खुलासा, फाईल्सचा आकडाच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 12:21 PM2023-04-26T12:21:37+5:302023-04-26T12:22:48+5:30

सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले आहेत. 

Chief Minister Eknath Shinde on leave or at work? A disclosure from the CM's office | मुख्यमंत्री रजेवर की कामावर? CM कार्यालयाकडून खुलासा, फाईल्सचा आकडाच सांगितला

मुख्यमंत्री रजेवर की कामावर? CM कार्यालयाकडून खुलासा, फाईल्सचा आकडाच सांगितला

googlenewsNext

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा येथील त्यांच्या मूळ गावी आहेत. दरे गावात मुख्यमंत्री शिंदे कुटुंबासह असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. राज्यात पहिल्यांदाच मुख्यमंत्री रजेवर गेलेत असं सांगत शिंदेंवर निशाणा साधण्यात आला. त्यावरून आता मुख्यमंत्री कार्यालयातून खुलासा करण्यात आला असून शिंदेंनी किती फाईल्सचा निपटारा केला हा आकडाच दिला आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या माहितीनुसार, सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (VC) मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला. मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात. त्या प्रलंबित राहू नयेत म्हणून नियमित निपटारा करण्यात येतो. मुख्यमंत्री सध्या सातारा दौऱ्यावर असून सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी व्हीसीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विभागांच्या ६५ फाईल्सचा निपटारा केला तसेच सूचना ही दिल्या. त्याचसोबत सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले आहेत. 

दरे गावी मुख्यमंत्र्यांनी भरवला जनता दरबार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुळगाव दरे येथे मुक्कामी असून, मंगळवारी त्यांनी जनता दरबार घेत तापोळा भागातील १०५ गावांतील समस्या जाणून घेतल्या. तसेच विविध विकासकामांवरही चर्चा केली. यावेळी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव. वर्षातून ते अनेकवेळा गावी येतात. यावेळी ते तापोळा भाग, कांदाटी खोऱ्यातील विकासासाठी बैठक घेतात. आताही मुख्यमंत्री शिंदे हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. दुसऱ्या दिवशी शिंदेंनी जनता दरबार घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री आहेत कुठे?
मुख्यमंत्री रजेवर आहेत अशा वृत्तपत्रात बातम्या आहेत. केवळ सामनात नाही तर इतरही आहेत. मुख्यमंत्री रजेवर असल्याचं अधिकृतपणे सीएम कार्यालयातून सांगण्यात येते. इथं कोकणात लोक छातीवर गोळ्या झेलतायेत, मरतायेत. मुख्यमंत्री आहेत कुठे? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी करत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 
 

Web Title: Chief Minister Eknath Shinde on leave or at work? A disclosure from the CM's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.