सिन्नर-शिर्डी महामार्गावरील बस अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:55 AM2023-01-13T10:55:04+5:302023-01-13T10:57:12+5:30
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली.
नाशिक : शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी-पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
शिर्डी महामार्गावर वावी- पाथरे दरम्यान पहाटे सहा वाजेच्या सुमारास सदर भीषण अपघात झाला. अंबरनाथ, उल्हासनगर भागातून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गाईड कंपनीची खासगी आराम बस (क्र. एम एच ०४ एफ के २७५१) सुमारे ५० प्रवाशांना घेऊन शिर्डीकडे निघाली होती. शिर्डी महामार्गावर वावी गावानंतर आराम बस व ट्रक(क्र. एम एच ४८ यांची समोरासमोर धडकली त्यानंतर खासगी बस उलटली. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला, तर जण जखमी झाले. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत.