"लाडक्या बहिणींची रक्कम वाढवू", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 12:54 PM2024-09-01T12:54:08+5:302024-09-01T12:54:53+5:30
Ladki Bahin Yojana: तुम्ही सरकारची ताकद वाढविली तर आम्हीही हात आखडता घेणार नाही. फक्त दीड हजारांवर थांबणार नाही. हे दीड हजार पुढे दोन हजार, अडीच हजार, तीन हजार होतील. लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
नागपूर - महायुती सरकारने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला पैसे दिले, भाऊबीजेला पण दिले जातील. हा माहेरचा आहेर आहे. ही योजना बंद होणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढविली तर आम्हीही हात आखडता घेणार नाही. फक्त दीड हजारांवर थांबणार नाही. हे दीड हजार पुढे दोन हजार, अडीच हजार, तीन हजार होतील. लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधीचे वितरण शनिवारी रेशीमबाग मैदानावर आयोजित सोहळ्यात करण्यात आले. यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मंत्री आदिती तटकरे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेने सर्व रेकॉर्ड तोडल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना धडा शिकवा. ही योजना सरकार बंद होऊ देणार असा त्रिवार संकल्प त्यांनी व्यक्त केला.
नितीन गडकरी यांनी ही योजना महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने राज्यात नव्या युगाची सुरुवात असल्याचे सांगितले. नोव्हेंबरमध्ये निवडणुका आहेत. तुम्ही आशीर्वाद द्या. पुढे पाच वर्षे ही योजना व्यवस्थित चालविली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तर, विरोधकांनी योजना बदनाम करण्यासाठी चुकीचे अर्ज भरले. त्यामुळे ५० हजारांवर अर्ज रद्द झाले. त्यांना नव्याने अर्ज भरण्याची संधी दिली जाईल, असे अदिती तटकरे
नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्य्यातील निधी वितरणाचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, गिरीश महाजन व चंद्रशेखर बावनकुळे. (छाया: मुकेश कुकडे)यांनी सांगितले.
'देवाभाऊ असेपर्यंत स्थगिती नाही'
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, योजना बंद व्हावी म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले. हे तेच आहेत जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व आमदार विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. माजी मंत्री सुनील केदार यांचे 'राइट हँड' म्हणून ओळखले जातात. त्यामुळे यांची नियत ओळखा. देवाभाऊ असेपर्यंत हायकोर्टात मोठा वकील उभा करू, काहीही झाले तरी योजनेला स्थगिती येऊ देणार नाही.
मुख्यमंत्री संघस्थानी, पवारांनी दर्शन टाळले
सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट देत समाधीस्थळाचे दर्शन घेतले. सोबत उपमुख्यमंत्री फडणवीस हेदेखील होते. मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या परिसरात येऊनही दर्शन टाळले. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते.