...तेव्हाच कळाले होते; ठाकरे-समाजवादी युतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 05:11 PM2023-10-15T17:11:32+5:302023-10-15T17:13:35+5:30
ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, ज्या लोकांना बाळासाहेबांनी जवळ केले नाही. या सगळ्यांना हे जवळ करतील हेच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
मुंबई – गेल्या अनेक दशकापासून दुरावलेले समाजवादी विचारांचे पक्ष आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील अंतर कमी झालं आहे. उद्धव ठाकरेंनी आज समाजवादी विचारांच्या १५० निवडक नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर आगामी निवडणुकीत समाजवादी आणि ठाकरे गटाने एकत्रित सामोरे जाण्याचं निश्चित झाले. तब्बल २ दशकांनंतर पुन्हा एकदा ठाकरेंनी धर्मनिरपेक्ष विचारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खेळ आणि राजकारण यात गल्लत करता कामा नये. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा केली, त्याच काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी डोक्यावर घेतले. तेव्हाच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व कळाले. बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला त्यांनी तिलांजली दिली आहे. या राज्यातील मतदारांचा विश्वासघात केला. उद्धव ठाकरेंकडून बाकी अपेक्षा नाही. ते आता सगळ्यांशी युती करतील असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
त्याचसोबत ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, ज्या लोकांना बाळासाहेबांनी जवळ केले नाही. या सगळ्यांना हे जवळ करतील हेच उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने केलेले काम आणि वर्षभरात राज्यात आम्ही करत असलेल्या विकासकामांना नक्की पोचपावती देतील. जनता मतदार सुज्ञ आहे. घरात बसलेल्या लोकांना जनता मतदान करणार नाही. रस्त्यावर उतरून विकासकामे करणाऱ्यालाच जनता मतदान करणार असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेनाप्रमुख मला नेहमी म्हणायचे, उद्धव एक लक्षात ठेव, केवळ तू लोकांना आवडावा म्हणून खोटा मुखवटा घालू नकोस. मी जसा आहे तसा आहे, एकतर स्वीकारा अन्यथा नकारा. मी त्यारितीने पुढे जातो. २१ समाजवादी पक्ष माझ्यासोबत येण्यास तयार झाले हे माझे भाग्य आहे. आपली लढाई ही व्यक्तिगत नव्हती, तर विचारांची होती. आज आपण सगळे एकत्र जमलोय, जुन्या आठवणींना उजाळा देतोय. आता एका वळणावर उभे आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.