मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून आवडतील - आमदार संतोष बांगर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 06:06 PM2023-01-21T18:06:40+5:302023-01-21T18:07:08+5:30
बाळासाहेबांनी जिवाचं रान केले, रक्ताचं पाणी केले आणि शिवसेना नावलौकाला आणली. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळेल असा दावा त्यांनी केला.
मुंबई - शिवसेना कुणाची? हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. त्यात धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदेंना मिळणार की ठाकरेंना याचा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्याजवळील पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे पक्षातंर्गत निवडणुका घेऊन पुन्हा हे पद स्वत:कडे ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. त्यात आता शिवसेना पक्षप्रमुखपद एकनाथ शिंदेंना मिळालं तर आनंद होईल असं विधान आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.
आमदार संतोष बांगर म्हणाले की, शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची जी निवड आहे त्यात महाराष्ट्राचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तर ते आम्हाला निश्चितपणे आवडणार आहे. धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मत आहे. बाळासाहेबांनी जिवाचं रान केले, रक्ताचं पाणी केले आणि शिवसेना नावलौकाला आणली. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळेल असा दावा त्यांनी केला.
३० जानेवारीला ठरणार शिवसेना कुणाची?
शिवसेना कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही आले नसून ठाकरे व शिंदे गटांनी केलेले युक्तिवाद संपले आहेत. येत्या ३० जानेवारीला दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर लेखी निवेदन सादर करावयाचे आहेत. आयोगाच्या या लेखी परीक्षेत आता पास कोण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, काही महिन्यांपासून आयोगाकडे एकनाथ शिंदे गट व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिवसेना व धनुष्यबाणावर आमचाच ताबा असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या १७ जानेवारीला अपूर्ण राहिलेला युक्तिवाद आज ठाकरे गटाचे कपिल सिब्बल यांनी पूर्ण केला. यानंतर त्याच गटाचे देवदत्त कामत यांनी पुन्हा युक्तिवाद केला. सादिक अलीचा संदर्भ शिवसेनेसाठी लागू होत नसल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.
ठाकरे गटाचा दावा काय होता?
शिवसेना पक्षाची घटना, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसेनेच्या संदर्भात निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या प्रतिनिधी सभेवर ठाकरे गटाचे वर्चस्व असल्याचा दावा या दोन्ही वकिलांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख पद बेकायदेशीर असल्याचा दावा करणाऱ्या या गटाचे आमदार व खासदारसुद्धा याच पक्षाच्या घटनेने मिळालेल्या अधिकारामुळे झालेले आहेत, याकडे कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधले.
लोकप्रतिनिधी म्हणजे राजकीय पक्ष होऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी त्या पक्षाचा भाग असतात, परंतु पक्षात असलेले पदाधिकारी व नेते, उपनेतेसुद्धा पक्षाचा अविभाज्य भाग असतात. या पदाधिकाऱ्यांच्या भरवशावर कोणताही राजकीय पक्ष उभा राहत असतो. यावर या गटाचा प्रामुख्याने भर राहिला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची संख्या ठाकरे गटाकडे अधिक असल्याचा दावा केला.