मुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारल्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा…”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 08:00 PM2022-06-30T20:00:55+5:302022-06-30T20:01:57+5:30
एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ.
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत शिवसेनेच्या आमदारांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले. मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
हा बाळासाहेबांच्या विराचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा विजय असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज्याचा विकास, सर्व घटकांना न्याय देण्याचं काम केलं जाईल. सर्वांना सोबत, विश्वासात घेऊन काम केलं जाईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसही सोबत आहेत. सर्वांच्या साथीनं विकासाचा गाडा पुढे नेण्याचं काम आम्ही करू, असंही ते म्हणाले.
यापूर्वी काय म्हणाले होते शिंदे?
“जो विश्वास भाजपनं आमच्या ५० आमदारांवर दाखवलाय तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्या ५० आमदारांच्या जोरावर ही लढाई लढलोय त्यांचे आभार मानतो. ज्या ५० लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो कदापि तोडणार नाही. जो यापूर्वी त्यांना अनुभव आला तोही त्यांना येऊ देणार नाही याची खात्री करेन,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याला पुढे नेण्यासाठी, विकासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.