Eknath Shinde : 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; वाचा- काय म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 10:02 PM2022-10-10T22:02:47+5:302022-10-10T22:03:22+5:30
शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव मिळाले आहे. पण, त्यांनी दिलेले निवडणूक चिन्हांचे तीनही पर्याय आयोगाने बाद ठरवत उद्या दुपारपर्यंत, नव्याने 3 पर्याय देण्यास सांगितले आहे.
राज्यात शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटत यांच्यात पक्षाच्या नावावरून आणि निवडणूक चिन्हावरून जोरदार संघर्ष सुरू होता. मात्र, या मुद्द्यावर आज निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)', असे नाव दिले असून मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तर, शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव मिळाले आहे. पण, त्यांनी दिलेले निवडणूक चिन्हांचे तीनही पर्याय आयोगाने बाद ठरवत उद्या दुपारपर्यंत, नव्याने 3 पर्याय देण्यास सांगितले आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर, आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार -
मिळालेल्या नावासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. "वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. #बाळासाहेबांची_शिवसेना", असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 10, 2022
आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. #बाळासाहेबांची_शिवसेनाpic.twitter.com/8UwEMxP3VC
आम्हाला लोकांच्या मनातलं नाव मिळालं -
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नावात आम्ही समाधानी आहोत. बाळासाहेबांची शिवसेना असंच आम्हाला नाव पाहिजे होतं आणि तेच नाव आम्हाला मिळालं आहे. याच नावाने आम्ही पुढे जाऊ. लोकांच्या मनातील नाव आम्हाला मिळालं आहे, असं भरत गोगावले म्हणाले. तसेच आत कोणतंही चिन्हं मिळालं तरी हरकत नाही, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे.