मराठी सर्वांना एकत्रित ठेवणारी, विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 07:51 AM2024-01-28T07:51:19+5:302024-01-28T07:52:31+5:30

Vishwa Marathi Sammelan: मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी, संघर्ष सर्वांना ठाऊक आहे.  म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे काढले.

Chief Minister Eknath Shinde's remarks at the inauguration of Vishwa Marathi Sammelan, which unites all Marathi | मराठी सर्वांना एकत्रित ठेवणारी, विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे उद्गार

मराठी सर्वांना एकत्रित ठेवणारी, विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे उद्गार

नवी मुंबई - मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी, संघर्ष सर्वांना ठाऊक आहे.  म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे काढले.

येथील सिडको प्रदर्शन केंद्रात शनिवारपासून विश्व मराठी संमेलनाला सुरुवात झाली. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. मराठी भाषा आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले होते. विविध परिसंवाद, नाट्य संमेलन, साहित्य संमेलन अशा विविध माध्यमांतून ‘माय मराठी’चा गजर सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आजच्या पिढीचा कल मराठी भाषेकडे वळविणे गरजेचे आहे.  मात्र यासाठी मराठी भाषेच्या लेखकांनी आजच्या पिढीचा ओढा लक्षात घेऊन साहित्य निर्मिती करायला हवी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वर्ल्ड  इकॉनाॅमी फोरमच्या माध्यमातून ३ लाख ५३  हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार स्वाक्षरीत झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी  यावेळी दिली.

मान्यवरांची मांदियाळी
-  या कार्यक्रमाला मराठी भाषा व शालेय शिक्षण तथा मुंबई (शहर) पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, आमदार मंदा म्हात्रे, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख.

- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष  डॉ. सदानंद मोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, माध्यम सल्लागार जयू भाटकर, मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, राज्य मराठी भाषा कोष मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Chief Minister Eknath Shinde's remarks at the inauguration of Vishwa Marathi Sammelan, which unites all Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.