मुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

By admin | Published: July 8, 2017 04:34 AM2017-07-08T04:34:03+5:302017-07-08T04:34:03+5:30

निलंगा (जि. लातूर) येथील हेलिकॉप्टर अपघाताची घटना ताजी असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये

Chief Minister escaped from helicopter crash | मुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

मुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

Next

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : निलंगा (जि. लातूर) येथील हेलिकॉप्टर अपघाताची घटना ताजी असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा तांत्रिक  बिघाड झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरक्षित असले तरी शासकीय हेलिकॉप्टरमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे व्हीआयपींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आज (शुक्रवारी) अलिबाग दौऱ्यावर होते. शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि सहकारी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या पहिल्या नाट्यगृहाचे उद्घाटन उरकून मुख्यमंत्री डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले.
अलिबागवरून कार्यक्रम उरकून मुंबईला निघण्याकरता ते हेलिकॉप्टरमध्ये चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक आॅफ घेतला. हेलिकॉप्टरचा पंखा देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्याला लागणार तोच उपस्थित सुरक्षारक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते बालंबाल बचावले. या माहितीला प्रत्यक्षदर्र्शींनी दुजोरा दिला.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून इन्कार
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला कोणताही अपघात झाला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र, रायगडचे जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा लँड करून फॅनची रिटेस्ट घेण्यात आली. त्यानंतर त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री मुंबईस सुखरूप रवाना झाले.

लोकमत वेबसाइटवर प्रथम

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची ब्रेकिंग न्यूज ‘लोकमत डॉट कॉम’वर झळकताच कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी लोकमत कार्यालयात येऊन याबाबत अधिक माहिती घेतली. त्यानंतर वृत्तवाहिन्यांवर हे वृत्त आले.


काळजाचा ठोका चुकला
गेल्या २५ मे रोजी निलंगा येथे खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. त्या अपघातातून मुख्यमंत्र्यांसह इतर अधिकारी बालंबाल बचावले होते. त्यामुळे शुक्रवारच्या प्रसंगाने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Web Title: Chief Minister escaped from helicopter crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.