मुख्यमंत्र्यांनी समजावला सरसकट कर्जमाफीचा अर्थ, 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा
By admin | Published: July 9, 2017 11:05 AM2017-07-09T11:05:06+5:302017-07-09T11:05:06+5:30
मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा अर्थ समजावून सांगितला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - राज्य सरकराने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यापासून या घोषणेतील सरसकट आणि तत्त्वत: या शब्दांवरून बराच गोंधळ उडाला आहे. अखेर आज मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा अर्थ समजावून सांगितला. देशातील इतर राज्यांनी कर्जमाफीची घोषणा करताना विविध अटी शर्ती लादल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात कर्जमाफीची घोषणा करताना आम्ही या सगळ्या अटी काढून टाकत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. म्हणून ही सरसकट कर्जमाफी आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफीमुळे 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून, चुकीच्या व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ मिळू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आज मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि या कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. त्यावेळी सरसकट कर्जमाफीबाबत ते म्हणाले की, "सुरुवातीला आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. पण नंतर इतर शेतकऱ्यांचाही प्रश्न पुढे आला. त्यानंतर आम्ही सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. देशातील विविध राज्यांनी वेगवेगळ्या अटी घालून कर्जमाफी दिली आहे. एकीकडे पंजाबने 5 एकरपर्यंत जमीन असलेल्यांना, तेलंगणाने, अल्पभूधारक शेतकऱ्यांना, कर्नाटकने केवळ जिल्हा बँकेतून कर्ज घेणाऱ्यांना तर आंध्र प्रदेशने दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्यांना कर्जमाफी दिली आहे. मात्र राज्य सरकारने कोणत्याही अटी शर्ती न घालता कर्जमाफीची घोषणा केली आहे. म्हणून ही सरसकट कर्जमाफी आहे." मात्र राज्याची आर्थिक कुवत पाहता संपूर्ण कर्ज माफ करणे शक्य नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलासा देण्यासाठी 25 हजार किंवा 25 टक्के रकमेचे अनुदान दिल्याचे सांगितले. तसेच या शेतकऱ्यांना भविष्यात विविध योजनांचा प्राधान्यक्रमाने लाभ दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांपैकी 82 टक्के शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ झाले आहे. तसेच चुकीच्या लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये यासाठी खबरदारी घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
"शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाही. त्यासाठी शेतीक्षेत्रातील गुंतवणूक आवश्यक आहे. मात्र दुष्काळ झेलत असलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज होती. आता शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध योजना आणल्या जातील. त्यासाठी राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.