मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर फटकेबाजी
By admin | Published: December 11, 2015 12:37 AM2015-12-11T00:37:29+5:302015-12-11T00:37:29+5:30
दुष्काळासारख्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर विरोधक राजकारण करत आहेत, त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही तर त्याआडून राजकारण करायचे आहे
नागपूर : दुष्काळासारख्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर विरोधक राजकारण करत आहेत, त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही तर त्याआडून राजकारण करायचे आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चौफेर हल्ला चढवला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील बोलल्यानंतर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता बोलायला उभे राहीले मात्र त्यांना थांबवत स्वत: मुख्यमंत्री उभे राहीले आणि त्यांनी विरोधकांना जोरदार टीका केली.
तुम्ही अनेक वर्षे सत्तेत होतात. कोणामुळे राज्यावर ही वेळ आली याच्या राजकारणात आपल्याला जायचे नाही. मात्र आज दोन दोन वर्षे पाऊसच नाही असे अनेक जिल्ह्ये राज्यात आहेत. पाण्यासाठी जनता त्रस्त आहे. शेतकरी संकटात आहे. अशावेळी राज्यभरातले शेतकरी मोठ्या आशेने अधिवेनाकडे पहात आहेत. राज्यावर कधीही येऊ नये असे संकट कोसळले आहे. तुमच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल, आम्ही सरकारमध्ये आहोत याचा काही फायदा होईल. दोघांनी मिळून राजकारण बाजूला सारुन या विषयाकडे पाहिले पाहिजे.
अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना कशा रितीने दिलासा देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. देशावर अशी संकटं आली की सगळे पक्ष आपापल्या भूमिका विसरुन एकत्र येतात असा इतिहास असताना विरोधकांना मात्र एकत्र न येता या विषयाचे राजकारण करण्यात जास्त रस आहे त्यामुळेच या वृत्तीचा मी निषेध करतो असेही मुख्यमंत्री म्हणाले, त्यावेळी सत्ताधारी बाकावरुन त्यांच्या भाषणाला जोरदार समर्थन मिळत होते. (प्रतिनिधी)