मुख्यमंत्र्यांनी दिली तावडेंना क्लीन चिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 04:05 AM2016-03-11T04:05:24+5:302016-03-11T04:05:24+5:30
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही. तावडे ज्या कंपनीचे संचालक आहेत, त्या कंपनीत त्यांचे कोणतेही भागभांडवल नाही आणि त्यांचे पद अकार्यकारी स्वरुपाचे आहे.
मुंबई : शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही. तावडे ज्या कंपनीचे संचालक आहेत, त्या कंपनीत त्यांचे कोणतेही भागभांडवल नाही आणि त्यांचे पद अकार्यकारी स्वरुपाचे आहे. शिवाय, सदर कंपनी सरकारला कोणतीच सेवा पुरवत नसल्याने आचारसंहितेचाही भंग होत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली.
काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी विधान परिषदेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून मंत्र्यांच्या आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांसाठी जी आचारसंहिता घालून दिली आहे, त्याचे महाराष्ट्रातील काही मंत्र्यानी उल्लंघन केले असून अशा मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रणपिसे यांनी केली. यावेळी तावडे यांचा नामोल्लेख करण्याचे मात्र त्यांनी टाळले. रणपिसे यांच्या मागणीला काँग्रेस सदस्य माणिकराव ठाकरे, संजय दत्त, जनार्दन चांदूरकर आणि राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली होती.