यशवंत सेनेकडून मुख्यमंत्र्यांना साडीचोळीचा अहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 06:07 AM2018-12-01T06:07:40+5:302018-12-01T06:07:55+5:30
पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत काही काळ आझाद मैदानात स्थानबद्ध केले होते.
मुंबई : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याच्या निषेधार्थ यशवंत सेनेने शुक्रवारी विधानभवनासमोर मुख्यमंत्र्यांना साडीचोळीचा अहेर देत आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत काही काळ आझाद मैदानात स्थानबद्ध केले होते.
यशवंत सेनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी सांगितले की, विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. धनगर समाज मात्र आरक्षणापासून वंचित आहे. धनगर नेत्यांना मंत्रीपद देऊन सरकारने गुंडाळले आहे. त्यात कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, खासदार विकास महात्मे, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचा समावेश आहे.
तीनही नेत्यांनी १० दिवसांत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा यशवंत सेनेने दिला आहे. यशवंत क्रांती सेनेनेही दोन दिवसांत धनगर संघटनांची बैठक घेऊन त्यात पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा ठरवणार असल्याचे क्रांती सेनेचे नवनाथ पडळकर यांनी सांगितले.