मुख्यमंत्री गोगोई यांचा हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा
By admin | Published: May 7, 2014 11:15 PM2014-05-07T23:15:52+5:302014-05-07T23:15:52+5:30
आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी हिंसाचारग्रस्त बक्सा आणि कोक्राझार जिल्ह्याला भेट दिली आणि तेथील जनतेला सरकारकडून सुरक्षा पुरविण्याची हमी दिली.
पुन्हा पाच मृतदेह सापडले : बळींची संख्या ४१, पीडितांची गावाला सशस्त्र करण्याची मागणी
भांगारपार (आसाम) : आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी हिंसाचारग्रस्त बक्सा आणि कोक्राझार जिल्ह्याला भेट दिली आणि तेथील जनतेला सरकारकडून सुरक्षा पुरविण्याची हमी दिली. दरम्यान, बुधवारी पुन्हा पाच मृतदेह सापडले. त्यामुळे बळींची संख्या ४१ वर पोहोचली आहे. गोगोई यांनी बालापारा येथील मदत शिबीर आणि अन्य ठिकाणांच्या शिबिरांना भेटी दिल्या. आत्मसमर्पण केलेल्या बीएलटी अतिरेक्यांनी वनरक्षकांच्या मदतीने आपल्यावर हल्ला केल्याचे स्थानिकांनी त्यांना सांगितले. सरकारने दुहेरी हल्ल्यासाठी प्रतिबंधित एनडीएफबी(एस)ला जबाबदार धरले आहे; परंतु हिंसाचारग्रस्त लोकांनी सत्ताधारी काँग्रेसशी आघाडी असलेला पक्ष बोडोलँड पीपल्स फ्रन्टने हल्ले केल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत बिगर बोडो उमेदवाराला मतदान केल्याचा बदला त्यांनी घेतला, असे हिंसाचारग्रस्ताचे म्हणणे आहे, असे सूत्रांनी सांगितले. भयभीत पीडितांनी आपल्या गावाला सशस्त्र करण्याची मागणी केली, तसेच त्यांनी आपले गाव स्वयंशासित बोडोलँड टेरिटोरिअल आॅटोनॉमस डिस्ट्रिक्ट (बीटीएडी) मधून वेगळे करण्याची मागणी केली. बीटीएडीमध्ये माजी बीएलटी नेत्याचे प्रशासन आहे. या नेत्याने आता बोडोलँड पीपल्स फ्रन्ट नावाने नवीन संघटना स्थापन केली आहे. दरम्यान, बक्सा जिल्ह्यातून वाहत असलेल्या बेकी नदीत पाच मृतदेह आढळून आले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. या मृतदेहामध्ये एक १० वर्षांची मुलगी आहे. तिच्या डोक्यावर गोळीची जखम आहे. पाचपैकी तीन मृतदेह बारपेटा जिल्ह्यात आणि दोन मृतदेह शेजारच्या बक्सा जिल्ह्यात आढळून आले. आतापर्यंत नव्याने हिंसाचाराची घटना घडली नसल्याने प्रशासनाने सकाळी ८ पासून आठ तासांकरिता बक्सा जिल्ह्यात आणि कोक्राझार जिल्ह्यात सकाळी ५ वाजेपासून १३ तासांकरिता संचारबंदी शिथिल केली. (वृत्तसंस्था)