आता राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना!
By admin | Published: December 17, 2014 11:51 PM2014-12-17T23:51:20+5:302014-12-17T23:51:20+5:30
एकूण बजेटच्या ४५ टक्के बजेट ग्रामविकास खात्याचे असते आणि त्यातला ७५ टक्के निधी केंद्राकडून राज्याच्या नोडल एजन्सीमार्फत थेट जिल्ह्याला जातो.
प्रश्न : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत नेमके काय असेल?
उत्तर : या योजनेत राज्य शासनाने निधी द्यावा असे अपेक्षित आहे. शिवाय राज्याच्या विविध योजनांचा आढावा घेऊन एकात्मिक योजना तयार केली जाईल व त्यातून हे काम केले जाईल. मंत्रिमंडळासमोर हा विषय नेला जाणार आहे.
प्रश्न : केंद्राचा ग्रामविकास खात्याचा निधी मिळवण्यात आघाडी सरकार यशस्वी ठरले नव्हते. आपण त्यासाठी काय करणार?
उत्तर : एकूण बजेटच्या ४५ टक्के बजेट ग्रामविकास खात्याचे असते आणि त्यातला ७५ टक्के निधी केंद्राकडून राज्याच्या नोडल एजन्सीमार्फत थेट जिल्ह्याला जातो. आपण पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा देखील निधी वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहोत.
निवडणुकांचा काळ, राजकीय कम्प्लशनपोटी द्यावा लागणारा वेळ वगळता बाकीचे दिवस मी सतत काम करीत राहणार आहे कारण माझे काऊंटडाऊन मी पदभार स्वीकारल्यापासूनच सुरू झाले आहे.
प्रश्न : जुन्या सरकारच्या तंटामुक्त गाव, गाडगेबाबा स्वच्छता अभियान या योजना चालू राहतील की बंद होणार?
उत्तर : कोणत्याची योजना बंद करणार नाही, मात्र सगळ्या योजनांचा आढावा घेऊ. ज्या योजना निष्फळ आहेत त्यांना पुनरुज्जीवित करू. ज्यातून काहीच निष्पन्न होत नसेल त्या बंद करू. सरकार चांगल्या योजना आणेल पण या सगळ्या योजनांचे यश-अपयश जनतेच्या प्रतिसादावर आणि मानसिकतेवर अवलंबून आहे.
प्रश्न : आपला विभाग नेमके कशावर फोकस करणार आहे?
उत्तर : मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जलयुक्त शिवार ही योजना जाहीर केली आहे.
मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे घेण्यात येतील जेणे करून ग्रामीण भागातील पिण्याचे पाण्याचे संकट कमी होण्यास मदत होईल. शिवाय ग्रामीण भागातील रस्ते चांगले करणे ही देखील महत्त्वाची बाब आपल्यापुढे आहे.
प्रश्न : जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था बिकट आहे. त्यासाठी काय करणार?
उत्तर : मी स्वत: चौथीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. त्यावेळीपेक्षा आज त्या शाळांची अवस्था वाईट आहे. मात्र यावर त्या त्या जिल्हा परिषदांचे नियंत्रण असते. या शाळांचे सर्वेक्षण करून त्या जास्तीतजास्त ‘चाईल्ड फ्रेंडली’ कशा होतील याकडे आमचे लक्ष असेल. कागदावरील चित्र आणि वास्तव यात खूप फरक आहे हे मलाही माहिती आहे. पण आम्ही प्रयत्न करणार हे नक्की.
प्रश्न : प्रत्येक खासदाराने गाव दत्तक घेण्याची योजना पंतप्रधानांनी मांडली आहे. राज्यात त्याचे रूप काय आहे?
उत्तर : खूप चांगला प्रतिसाद आहे. मी स्वत: हिवरेबाजार येथे दिवसभराचा प्रशिक्षण वर्ग घेतला. पाणलोट, वनीकरणाची कामे पाहिली. आदर्श ग्राम योजनेचा कालावधी तीन वर्षाचा आहे. या काळात राज्यातली जवळपास ५० ते ६० गावे एकदम बदलेली दिसतील यासाठी आमचे काम चालू आहे.