मुख्यमंत्र्यांनी टाळली टीका
By admin | Published: February 11, 2017 01:57 AM2017-02-11T01:57:45+5:302017-02-11T01:57:45+5:30
राज्यात जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही झंझावाती दौरे सुरू आहेत.
बुलडाणा : राज्यात जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही झंझावाती दौरे सुरू आहेत. मुंबई आणि पुण्यात भाजपा-शिवसेनेदरम्यान कलगी तुरा रंगला असला तरी, बुलडाण्यातील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी याबाबत ‘ब्र’ही न उच्चारता केवळ विविध शासकीय योजनांचा पाढा वाचला.
एकीकडे शिवसेना नेते भाजपा नेत्यांवर तोंडसुख घेत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून फडणवीस सरकारवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बुलडाण्यात आले होते. प्रचारसभेत मुख्यमंत्री विरोधकांचा चांगलाच समाचार घेतील, शिवसेनेला खडे बोल सुनावतील, अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी कुठलेही राजकीय भाष्य करणे टाळले. गेल्या अडीच वर्षांत केलेल्या विकास कामांचा आढावा घेणाऱ्या त्यांच्या भाषणामुळे ही सभा केवळ ‘योजनांचा प्रचार’ अशीच ठरली.
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपाने दणदणीत विजय मिळविला, दोन महिन्यापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही भाजपाचा विजयाचा आलेख उंचावला, या विजयानंतर मुख्यमंत्री प्रथमच दौऱ्यावर आले होते. त्यामुळे या निवडणुकांचा संदर्भ देत ते विरोधकांना फैलावर घेतील, अशी अपेक्षा भाजपासह
सर्वच राजकीय क्षेत्राला होती. प्रत्यक्षात मात्र
त्यांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात एकही राजकीय विधान केले नाही. त्यामुळे त्यांचे भाषण बरेच कंटाळवाणे झाले. (प्रतिनिधी)