मुख्यमंत्र्यांनी आत्मपरिक्षण करावे
By admin | Published: July 26, 2016 07:24 PM2016-07-26T19:24:49+5:302016-07-26T19:24:49+5:30
हिंदूत्त्ववादी संघटना, नेते आणि संतांवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात राज्यातील सुमारे २० संघटनांनी एकत्र येत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ : हिंदूत्त्ववादी संघटना, नेते आणि संतांवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात राज्यातील सुमारे २० संघटनांनी एकत्र येत आक्रमक पवित्रा घेतला आहे. गृहमंत्री पदावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला या संघटनांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे.
संजय दत्तला पॅरोल मिळते, मात्र आसाराम बापू, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांना जामीन मंजूर होत नाही. त्यामुळे न्यायालय त्यांची जबाबदारी योग्यरित्या पार पाडत नसल्याचे मतही हिंदू विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता विरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केले. शिवाय सरकारविरोधात २८ जुलैला दुपारी २ वाजता आझाद मैदानात निषेध आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या आंदोलनात हिंदु महासभा, हिंदु राष्ट्र सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भारतीय युवा शक्ती, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती, वीर जिजामाता प्रतिष्ठान, अजिंक्य मावळा प्रतिष्ठान, रायगड संवर्धन समिती, महाराणा प्रताप बटालियन, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, हिंदु, गोवंश रक्षा समिती, मातृभूमी प्रतिष्ठान, श्री बजरंग दल, ब्लड हेल्प हिंदुस्थान, राष्ट्रीय नवयुवक लोकसेवा संघ, दुर्गवीर प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य समविचारी संघटना सामील होणार आहेत.