धान संशोधक खोब्रागडे यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 10:00 PM2018-06-03T22:00:29+5:302018-06-03T22:00:29+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धान संशोधक तथा एचएमटी या वाणाचे प्रणेते दादाजी खोब्रागडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून, खोब्रागडे यांच्या निधनाने कृषी प्रगतीसाठी झटणारा एक प्रामाणिक संशोधक हरपला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धान संशोधक तथा एचएमटी या वाणाचे प्रणेते दादाजी खोब्रागडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून, खोब्रागडे यांच्या निधनाने कृषी प्रगतीसाठी झटणारा एक प्रामाणिक संशोधक हरपला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, खोब्रागडे यांनी संशोधित केलेल्या धान वाणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन धान शेतीत गुणात्मक सुधार झाला आहे. खोब्रागडे हे खऱ्या अर्थाने मातीशी इमान राखणारे आणि तिचे ऋण फेडणारे संशोधक होते. राज्याचे कृषी क्षेत्र त्यांच्या योगदानाप्रति सदैव कृतज्ञ राहील.
इयत्ता तिसरी शिकलेला कृषीतज्ज्ञ
१९८३ मध्ये ते तांदळाचे संशोधक म्हणून समोर आले. त्यांचे शिक्षण जेमतेम इयत्ता तिसरीपर्यंत झाले. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणसुद्धा घेता आले नाही. मात्र त्यांनी आपल्या शेतात धान पीक लावून त्यावर संशोधन केले. दादाजींनी धान संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. शरद पवारांपासून ते डॉ. अब्दुल कलाम यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांना सन्मानित केले आहे. अवघ्या दीड एकर शेतीत त्यांनी धानपिकाचे विविध यशस्वी प्रयोग केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत फोर्ब्सने २०१० मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते. ५ जानेवारी, २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या नावावर नऊ धान वाण विकसित करण्याचा विक्रम आहे. त्यांनी विकसित केलेली धानाची प्रजाती आजही देशाच्या विविध भागात उत्पादित केली जाते.
दादाजींनी विकसित केलेले नऊ वाण
एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू हे नऊ तांदळाचे वाण दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केले आहे.