मुख्यमंत्री, माऊलीचे ऐका - उद्धव ठाकरे

By Admin | Published: July 6, 2017 07:47 AM2017-07-06T07:47:46+5:302017-07-06T07:48:29+5:30

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवडीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर पुन्हा निशाणा साधला आहे.

Chief Minister, listen to Mauli - Uddhav Thackeray | मुख्यमंत्री, माऊलीचे ऐका - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री, माऊलीचे ऐका - उद्धव ठाकरे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कराडचे भाजपा नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य सरकारने सोमवारी केली. यावरुनच आजच्या सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर पुन्हा निशाणा साधला आहे. 
 
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर वारक-यांचे वर्चस्व राहील असे वाटत होते, पण भारतीय जनता पक्षाला राजकीय भस्म्यारोगाची लागण झाल्याने कराडमधील भाजप नेते अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील नऊ जणांची समिती जाहीर करून माऊलीच्या पायाशीच राजकारण नेऊन ठेवले, अशी बोचरी टीका उद्धव यांनी भाजपावर केली आहे. 
राजकारण करण्यासाठी व नेमणुका करण्यासाठी सध्या मोकळे रान असताना मंदिरातही ही अशी घुसवाघुसवी बरी नाही, असा टोलाही यावेळी हाणण्यात आला आहे. 
 
काय आहे आजचे सामना संपादकीय ?
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल, जीवभाव…
असे आर्जव करीत लाखो वारकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे ऊनपावसाची पर्वा न करता याही वर्षी आषाढी एकादशीला पंढरीच्या विठूरायाचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या या भक्तीमध्ये ना कुठला ऐहिक स्वार्थ असतो ना फायद्याचा विचार. स्वार्थ असलाच तर तो फक्त विठूरायाच्या दर्शनाचा आणि निरलस भक्तीचा, पण या विठ्ठलाचा म्हणजे माऊलीचा ताबा महाराष्ट्रातील राजकारण्यांनी घेतल्यामुळे वारकरी यावेळी संतापले व रस्त्यावर उतरले. राज्य सरकारने रविवारी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची घोषणा केली. या समितीवर वारकऱ्यांचे वर्चस्व राहील असे वाटले होते, पण भारतीय जनता पक्षाला राजकीय भस्म्यारोगाची लागण झाल्याने कराडमधील भाजप नेते अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील नऊ जणांची समिती जाहीर करून माऊलीच्या पायाशीच राजकारण नेऊन ठेवले. राजकारण करण्यासाठी व नेमणुका करण्यासाठी सध्या मोकळे रान असताना मंदिरातही ही अशी घुसवाघुसवी बरी नाही. अतुल भोसले व नव्या समितीविरुद्ध दीड लाख वारकऱ्यांनी माऊलीची पालखी थांबवून रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. मंदिर समितीमध्ये राजकारण्यांचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे ही समिती बरखास्त करून वारकऱ्यांचे प्रतिनिधी असलेली नवी समिती स्थापन करण्याची मागणी सुरू आहे.
 
वारकऱ्यांचा संताप
हा श्रद्धेतून निर्माण झाला आहे. राजकारणी हा माऊलीचा भक्त किंवा वारकरी असू शकतो. नव्हे तो असायलाच हवा. वि. स. पागे व भारदे बुवा यांनी राजकारणात राहून माऊलीची केलेली सेवा विसरता येत नाही. पागे व भारदे हे राजकारण्यापेक्षा वारकरीच जास्त होते, पण पागे-भारदे बुवांच्या तुलनेत अतुल भोसले कुठे बसतात? भोसले हे राजकारणात, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात कर्तबगार असतील. सातारा व कराडमध्ये त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन कामगिरी फत्ते केली असेल. उद्याच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भोसल्यांकडून मोठी अपेक्षा असेल तर ते ठीक आहे, पण त्यांचे नेतृत्व वारकऱ्यांवर व माऊलीवर का लादायचे? शासनाच्या ताब्यात शिर्डी, कोल्हापूर, तुळजापूर अशी देवस्थाने आहेत. तिथेही तशा राजकीय नेमणुका होत असतात, पण आळंदी आणि पंढरपूर ही वारकऱ्यांचीच देवस्थाने आहेत. लाखो भाविकांची ही मांदियाळी आहे. भक्ती आणि नीती यांचा संगम म्हणजे भागवत धर्म आहे. मानवी जीवनात ईश्वरी प्रेमाची अनुभूती घेऊन जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी भक्ती हाच सुलभ मार्ग आहे असे सांगणारा हा वारकरी संप्रदाय आहे. अशा पंढरीत तरी
 
राजकीय नेमणुका
 
करू नयेत ही लाखो वारकऱ्यांची इच्छा असेल तर त्यांचा मान मुख्यमंत्र्यांनी राखायला हवा. राममंदिरापासून पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत फक्त राजकीय टाळ-चिपळय़ाच वाजायला लागल्या तर कसे व्हायचे! आधीच्या सरकारने ज्या चुका केल्या त्याच पुन्हा करण्यात काय हशील? निदान या सरकारने तरी त्याची पुनरावृत्ती टाळायला हवी. काही गोष्टी भक्तांच्याच हातात राहू द्या. पंढरीच्या विठू माऊलीचीदेखील हीच इच्छा असेल! मुख्यमंत्री, माऊलीचे ऐका. आषाढी एकादशीनिमित्त राज्य सरकारच्या वतीने माऊलीची महापूजा सौ. व श्री. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडली. मुख्यमंत्र्यांनी तेव्हा सांगितले, ‘‘विठ्ठलाच्या कृपेमुळे निलंग्यातील हेलिकॉप्टर अपघातातून बचावलो.’’ अपघाताच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री एका गावात गेले होते. तिथल्या कीर्तनकारांनी मुख्यमंत्र्यांना विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट दिली. ती मूर्ती सोबत घेऊनच मुख्यमंत्री प्रवासाला निघाले होते, पण त्याच दिवशी हेलिकॉप्टरला अपघात झाला. त्यात हेलिकॉप्टरमधील सर्व सामानाची नासधूस झाली, पण विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला थोडाही धक्का लागला नव्हता असे मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात सांगितले. माऊलीने मुख्यमंत्र्यांना वाचवले, महाराष्ट्रावरील संकट टाळले. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांवरील संकट टाळावे!

Web Title: Chief Minister, listen to Mauli - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.