मुख्यमंत्र्यांना पारदर्शकतेपेक्षा खुर्ची प्यारी
By admin | Published: March 5, 2017 02:19 AM2017-03-05T02:19:09+5:302017-03-05T02:19:09+5:30
राज्यातले सरकार आणि स्वत:ची खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवून आणि महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातले सरकार आणि स्वत:ची खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवून आणि महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मुंबईत महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर अशोक चव्हाण म्हणाले की, ‘मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त करण्यापेक्षा, राज्यातले सरकार वाचवणे ही प्राथमिकता असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची टिकवण्याला महत्त्व दिले आहे. शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षांकडून प्रचारात झालेले आरोप-प्रत्यारोप हे फक्त मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेले नाटक आहे, हे आमचे म्हणणे खरे ठरले, शिवाय भाजपा हा जनतेसाठी विश्वासघातकी पक्ष आहे, हेही पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.’
‘अच्छे दिन’च्या नावाने देशाची आणि ६५०० कोटी रुपयांच्या नावाने कल्याण-डोंबिवलीकरांची फसवणूक करणाऱ्या भाजपाने, पारदर्शकतेच्या नावावर आता मुंबईकरांची फसवणूक केल्याचे खा. चव्हाण यांनी बोलून दाखवले.
मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारात भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. शिवसेना हप्तेखोरांचा पक्ष असून, मुंबई महापालिकेतून मिळणाऱ्या टक्केवारीवर शिवसेना चालते, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली होती. मग आता निवडणुकीतून माघार घेऊन, या माफिया, हप्तेखोर, भ्रष्टाचारी लोकांच्या हातात मुंबईकरांना का सोपवले? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना द्यावे, असे खा. चव्हाण म्हणाले. गेल्या २२ वर्षांत शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. यापुढेही राज्यात, केंद्रात आणि मुंबई महापालिकेत एकमेकांच्या सहकार्याने हे चालूच राहाणार आहे, असे खा. चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हा तर राजकीय पळपुटेपणा - विखे
भारतीय जनता पार्टीने शिवसेनेविरोधात मुंबईत महापौरासह कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय म्हणजे, महाराष्ट्राच्या जनतेची पारदर्शक फसवणूक आहे. भाजपाने मांडवली करून शिवसेनेच्या माफियाराजला पारदर्शक संमती दिल्याची घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
विखे पाटील म्हणाले, ‘कोणतीही निवडणूक न लढण्याच्या आणि विरोधी पक्षनेतेपदसुद्धा न स्वीकारण्याच्या भूमिकेतून भाजपाची शिवसेनेला विरोध करण्याची मानसिकता नाही, हे स्पष्ट होते. पालिकेत सेनेचे माफियाराज असल्याचा जाहीर आरोप करणारा भाजपा आता सेनेशी तह करत आहे.
विखे पाटील म्हणाले. पराभव होणार याची जाणीव असतानाही, लोकशाहीत अनेकदा केवळ वैचारिक भूमिका स्पष्ट करण्यासाठी निवडणूक लढवायची असते. पराभव जरी झाला असता, तरीही त्यांची अब्रू शिल्लक राहिली असती. आम्हालाही मांडवली करता येते, हे भाजपाने दाखवून दिले आहे.’