मुख्यमंत्र्यांनी केली महादेव जानकरांची कानउघाडणी !
By Admin | Published: October 14, 2016 02:09 AM2016-10-14T02:09:05+5:302016-10-14T08:28:48+5:30
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
यदु जोशी
मुंबई, दि. ११ - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
‘आपण राज्याचे जबाबदार कॅबिनेट मंत्री आहात. जाहीररीत्या अशी भाषा वापरणे योग्य नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेच काय इतर कोणाहीबद्दल आपल्याकडून अशी विधाने होता कामा नये’, अशी समज मुख्यमंत्र्यांनी जानकर यांना आज बोलावून दिल्याचे समजते. आपल्या विधानांनी सरकारबद्दलचा चांगला मेसेज समाजामध्ये जातो का, याचा विचार सरकारमधील प्रत्येकानेच करण्याची आवश्यकता आहे. एकानेही वादग्रस्त विधाने केली तर त्यामुळे सरकारची अडचण होते, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी मांडली. यानंतर जानकर यांनी लगेच दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन माध्यमांकडे पाठवले.
जानकर यांचे स्पष्टीकरण
मी कोणाला शिवी दिलेली नाही. भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारे व त्यावर राज्य करणाऱ्यांना जो ग्रामीण शब्द रुढ आहे. वाटल्यास शब्दकोशांत तो तपासावा. खंडेरायाची शपथ, मी गरिबांचा प्रतिनिधी आहे. बलाढ्यांशी लढा देतो, पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला वैयक्तिक दुखावण्यासाठी ते बोललो नाही. विपर्यास झाला हे मात्र वाईट. अर्थ चुकीचा लावल्याने लोकांचे मन कलुषित झाले असल्यास मी खेद व्यक्त करतो, असे निवेदन जानकर यांनी आज जारी केले.