ओल्या दुष्काळासंदर्भात फडणवीसांची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 05:50 PM2019-11-04T17:50:48+5:302019-11-04T19:28:03+5:30
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून अकरा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही...
मुंबई : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून अकरा दिवस उलटल्यानंतरही सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नाही. सत्तेत आणि मुख्यमंत्रीपदात 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना अडून बसली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. तर अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी शाहांची भेट घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ( एनडीआरएफ ) चे अध्यक्षपद गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे. आपत्ती निवारण निधीचे वाटप करण्याचे अधिकार शहा यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन महाराष्ट्राला मदत करण्याची विनंती केली आहे.
राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरु आहे तर दुसरीकडे परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यात कुणाचा सरकार येणार व शेतकऱ्यांना मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ चर्चा झाली. राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, यासाठी शहांची भेट घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
एखांद्या राज्यात शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपती आल्यास तेथील शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम राज्य सरकारचे असते. या सर्वाची विशेष जवाबदारी राज्य कृषिमंत्री यांच्यावर असते. मात्र मदत करण्यासाठी लागणारी रक्कम राज्यसरकारकडून पुरवणे किंवा आपत्ती मोठी असल्यास केंद्र सरकारकडे राज्य सरकार मदत मागू शकतो.