मुख्यमंत्री, माझ्या मैत्रीचे राजकीय भांडवल नको - राधाकृष्ण विखे
By admin | Published: July 11, 2017 05:34 AM2017-07-11T05:34:02+5:302017-07-11T05:34:02+5:30
माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे मांडून ते सोडविण्यास प्राधान्य दिले. आमची मैत्री ही केवळ विकास कामांसाठी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे मांडून ते सोडविण्यास प्राधान्य दिले. आमची मैत्री ही केवळ विकास कामांसाठी आहे. त्याचे कोणीही राजकीय भांडवल करू नये. सरकारच्या लोकविरोधी धोरणांबाबत विरोधी पक्षनेता म्हणून संघर्षाची भूमिका कायम राहील, असे स्पष्टीकरण विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिर्डीत झालेल्या कार्यक्रमात विखे यांनी ‘हे’ सरकार मला घरच्यासारखे वाटते, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांनीही विखेंसारखा विरोधी पक्षनेता अजून झालेला नाही, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता. त्यानंतर विखे हे भाजपाच्या तर वाटेवर नाही ना, असे विचारले जात होते.
त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, साई समाधी शताब्दी आराखडा, निळवंडे कालवे आदी प्रश्नांमध्ये सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबाबत कृतज्ञता व्यक्त केली व रखडलेल्या कामांना गती मिळावी, असा माझा प्रयत्न होता़ त्यानिमित्ताने केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाला़ पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहोत.
>मुख्यमंत्र्यांशी जुनी मैत्री आहे़ मी मंत्रिमंडळात असताना अनेकदा तेही माझ्याकडे सार्वजनिक हिताची कामे घेऊन येत़ ते सत्तेत असल्याने जनतेची कामे घेऊन मला त्यांच्याकडे जावे लागते. याचा अर्थ आम्ही आमच्या राजकीय भूमिका व विचारांपासून दूर गेलो, असा होत नाही. मैत्रीचा राजकीय विचारधारा व राजकारणातील निर्णयांशी संबंध जोडणे उचित नाही.
- राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते, विधानसभा