केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच मुख्यमंत्री बचावले

By admin | Published: May 25, 2017 05:31 PM2017-05-25T17:31:18+5:302017-05-25T17:42:52+5:30

मुख्यमंत्र्यांसह चौघे जण बालंबाल बचावले असून, पायलट संजय कर्वे किरकोळ जखमी झाले आहेत.

Chief Minister only survived the fortunes of fortune | केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच मुख्यमंत्री बचावले

केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच मुख्यमंत्री बचावले

Next
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 25 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर निलंगा येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावरून मुंबईच्या दिशेने गुरुवारी सकाळी ११.४८ वाजण्याच्या सुमारास टेकअप होत असताना अचानक कोसळले. या अपघातात मुख्यमंत्र्यांसह चौघे जण बालंबाल बचावले असून, पायलट संजय कर्वे किरकोळ जखमी झाले आहेत. ८० फुटांवरून हेलिकॉप्टर थेट जमिनीवर कोसळले असते वा ११ किलो वॅट व्होल्टची वीज वाहणा-या तारांवर कोसळले असते वा हेलिकॉप्टर थांबले. तेथून सात फुटांवर असलेल्या २२० केव्हीच्या डीपीतील ट्रान्सफॉर्मरवर आदळले असते तर काय झाले असते वा हेलिकॉप्टरमध्ये स्फोट झाला असता, याचा विचारच न केलेला बरा. त्यामुळे केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच या अपघातातून मुख्यमंत्री वाचल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारपासून लातूर जिल्हा दौ-यावर होते. निलंगा येथे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घरी मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी ७ वाजता हलगरा येथे मुख्यमंत्र्यांनी पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमाला भेट देऊन श्रमदानही केले. त्यानंतर औराद शहाजानी, हंगरगा, अनसरवाडा गावांना भेटी देऊन संवाद सभा घेतल्या. संवाद सभेचा कार्यक्रम आटोपून ते परत निलंग्याकडे रवाना झाले. शिवाजी विद्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडवरून मुंबईकडे रवाना होण्यासाठी ११.३० वाजता पोहोचले. ११.४८ वाजता ते हेलिकॉप्टरमध्ये जाऊन बसले. त्यांच्यासमवेत अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, जनसंपर्क अधिकारी केतन पाठक, खासगी स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार आणि पायलट संजय कर्वे व अन्य एकजण होते. ११.४९ वाजता हेलिकॉप्टर टेकअप् झाले. यावेळी सारा परिसर धुळीने व्यापला. यातच ५०-६० फुटांवर हेलिकॉप्टरने उड्डाणही घेतले.  मात्र हवेचा दाब कमी झाल्याने हेलिकॉप्टर अस्थिर झाले. त्यामुळे पायलट संजय कर्वे यांनी हेलिकॉप्टर लँडिंग करीत असताना विजेच्या तारांना हेलिकॉप्टरचा पंखा घासल्याने पुन्हा आणखीनच हेलिकॉप्टर अस्थिर झाले आणि काही कळण्याच्या आतच हेलिकॉप्टर म्हाडा झोपडपट्टीतील रस्त्यावर कोसळले. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला आणि भरत कांबळे यांच्या घराला घासून हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात जनसंपर्क अधिकारी केतन पाठक यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला असून, केवळ नशीब बलवत्तर असल्याने मुख्यमंत्री फडणवीस, प्रवीणसिंह परदेशी, अभिमन्यू पवार व दोन पायलट सुखरुप बचावले आहेत. 
 
वीज प्रवाह तत्काळ बंद झाल्याने मोठा अनर्थ टळला... 
हेलिकॉप्टरचे पंखे वीज तारांना लागले. यामुळे स्पार्किंग होऊन तारा तुटल्या. सुदैवाने तारा तुटून वीज प्रवाहही खंडित झाला. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, काही क्षणातच हेलिकॉप्टर म्हाडा झोपडपट्टीतील एमएच २४ बीजे २३७४ या ट्रकवर आढळून जमिनीवर कोसळले. यावेळी एकच हाहा:कार उडाला. पोलीस प्रशासन, अग्निशमन दल या सर्वांनीच म्हाडा झोपडपट्टीत धाव घेतली. 
 
भय काळजात ठेवून मुख्यमंत्र्यांना निलंगावासीयांनी हेलिकॉप्टरमधून उतरविले... 
पोलीस आणि मैदानावरील कार्यकर्ते म्हाडा झोपडपट्टीत पोहोचण्यापूर्वीच तेथे उपस्थित असलेले नागरिक इरफान शेख यांनी हेलिकॉप्टरचे दार काढून मुख्यमंत्र्यांना बाहेर काढून अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी रवाना केले. येथे तज्ज्ञ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांची प्रकृतीची तपासणी केली. 
 
पवनहेस कंपनीचे हेलिकॉप्टरमध्येच होता दोष....
जेमतेम तीन वर्षांपूर्वीचे जुने असलेले हेलिकॉप्टर सिकॉरस्की कंपनीचे आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सात प्रवासी क्षमता असून, दिवसाला ८०० कि.मी. प्रवास या हेलिकॉप्टरमधून करता येऊ शकतो. मागच्या छोट्या पंख्यात हवेचा कमी दाब निर्माण झाला. त्यातच टेकअप होताना या पंख्याला विजेच्या तारांचे घर्षण झाल्याने हेलिकॉप्टर अस्थिर झाल्याचे बोलले जात आहे. 
 
अपघातात मुख्यमंत्र्यांचा मोबाईल हरवला... 
अपघातात मुख्यमंत्र्यांचा मोबाईल हरवला असून, हेलिकॉप्टरच्या अपघातस्थळी पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी मोबाईलचा शोध घेतला. मात्र मोबाईल सापडला नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Chief Minister only survived the fortunes of fortune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.