‘पगारवाल्या’ भार्इंसाठी ‘बच्चा’ मुख्यमंत्री धावले
By admin | Published: December 10, 2015 02:55 AM2015-12-10T02:55:46+5:302015-12-10T02:55:46+5:30
‘भाई तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती, या शब्दात पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलकी टीका केली होती. भार्इंनी मुख्यमंत्र्यांना बच्चा म्हटले होते.
यदु जोशी, नागपूर
‘भाई तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती, या शब्दात पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलकी टीका केली होती. भार्इंनी मुख्यमंत्र्यांना बच्चा म्हटले होते. तथापि, आगामी विधान परिषद निवडणुकीत ‘पगारवाल्या’ भार्इंसाठी बच्चा मुख्यमंत्री धावून गेले आहेत. त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
मुंबईत विधान परिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक होत असून भाजपा-शिवसेना युतीमध्ये एक जागा शिवसेनेला मिळाली असून विद्यमान आमदार असलेले रामदास कदम हेच शिवसेनेचे उमेदवार आहेत. तथापि, दुसऱ्या जागेसाठी भाजपाने उमेदवार दिला नाही तर रामदास कदम यांना कोणताही धोका न होता ते निवडून येतील, असे चित्र होते. तथापि, भाजपाने मनोज कोटक यांना अधिकृतपणे उमेदवारी दिल्याने कदम अस्वस्थ झाले होते. सूत्रांनी सांगितले की ही अस्वस्थता कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर काल घातली. भाजपाचा उमेदवार राहिला तर शिवसेनेला काही दगाफटका होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. भाजपाने उमेदवारच देऊ नये, असा कदम यांचा आग्रह होता. त्यांच्या हट्टानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तथापि, भार्इंना भय नाही, ते नक्कीच जिंकतील पण भाजपाचाही एक उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे अभय मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांचे समाधान झाले आणि शिवसेनेने एक तर भाजपाने एक जागा लढण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना सांगितले की, शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणी करण्याचा भाजपाचा कोणताही हेतू नाही. शिवसेनेला स्वत:च्या बळावर कदम यांना निवडून आणण्यात अडचण येणार नाही. भाजपाची मते, शिवसेनेची शिल्लक मते आणि अन्य पक्ष/अपक्षांची मते मिळवून कोटक यांना जिंकविण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेवर समाधान झाल्याने उद्धव यांनी भाजपाने दुसरी जागा लढविण्यास ‘एनओसी’ दिली, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.