मुख्यमंत्र्यांनी उघड केली बिल्डरांची खेळी, मुंबईतील भाडेकरूंना हक्काचे घर
By admin | Published: July 17, 2015 12:32 AM2015-07-17T00:32:31+5:302015-07-17T00:32:31+5:30
मुंबई उपनगरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील भाडेकरूंची होत असलेली फसवणूक थांबवता यावी म्हणून आणि त्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून याच अधिवेशनात
मुंबई : मुंबई उपनगरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील भाडेकरूंची होत असलेली फसवणूक थांबवता यावी म्हणून आणि त्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून याच अधिवेशनात त्यासाठी कायदा केला जाईल, जर विधेयक आले नाही, तर वटहुकूम काढला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्याचवेळी भाडेकरूंच्या इमारतींच्या बाबतीत बिल्डर कसे वागतात याचे वर्णन मुख्यमंत्र्यांनीच स्वत: सभागृहात केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाडेकरू, रहिवाशांनी बनविलेली यादी, मिळणारा एफएसआय, इमारत मालक, संस्था, विकासक यांना देणे, भाडेकरू, मालक, रहिवाशी यांच्या मालमत्तेच्या हक्कात बाधा येणार नाही असे सांगणे या गोष्टी धोरणाचा भाग म्हणून ठीक आहेत. त्या धोरणामुळे भाडेकरूंचा हक्क अबाधित राहतो; पण त्याला घराची शाश्वती उरत नाही. पाडली जाणारी इमारत किती काळात बांधून पूर्ण होईल याचे कोणतेही बंधन बिल्डरवर नसते. बिल्डर पळवाटा काढतात, घर मिळणार हे कागदावरच राहते. पण ते घर कधी मिळेल हेदेखील कळत नाही. यासाठी कायद्यातच बदल करावे लागतील. आपल्या विभागातर्फे यासाठीच्या कायद्याचा मसुदा याच अधिवेशनात आणला जाईल. जर ते शक्य झाले नाही, तर आपण अध्यादेश आणू असे या सभागृहातच घोषित करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खोटे आॅडिट करणाऱ्यांवर कारवाई
-स्ट्रक्चरल आॅडिट करतानाही खोटे आॅडिट करून इमारती रिकाम्या करून घेतल्या जातात. अशावेळी बिल्डरच्या दबावाखाली येऊन अधिकारी काम करतात. अशा दबावाखाली येऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय ट्रांझीट कॅम्पमध्ये बेकायदा राहणाऱ्यांच्या संबंधी अनेक आमदार प्रश्न विचारत आहेत; त्यासाठी ट्रांझीट कॅम्पच्या संबंधी स्वतंत्र लक्षवेधी लावा, असेही मुख्यमंत्र्यांनीच सुचवले.
दुर्घटनेची होती भीती
- भाजपाचे अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. मुंबई शहर व उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाश्यांना महानगरपालिकेच्या नियम ३५४ नुसार घरे रिकामे करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत; मात्र अशा इमारतींमधील रहिवाशांना पुन्हा आपले हक्काचे घर मिळेल याची कोणतीच शाश्वती नसल्यामुळे रहिवासी घर सोडायला तयार होत नाहीत.
त्यामुळे अशा इमारती कोसळून दुर्घटना घडतात, असेही भातखळकर म्हणाले. या चर्चेत आ. आशिष शेलार, आ. योगेश सागर, आ. मंगलप्रभात लोढा, आ. राज पुरोहित आदींनीही भाग घेतला.