राज्यातील पूर परिस्थिती आणि मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 03:01 PM2019-08-07T15:01:51+5:302019-08-07T15:02:55+5:30

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थिती यंत्रणांमार्फत सुरू असलेले मदतकार्य याबाबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेतला.

Chief Minister reviewed the flood situation and relief work in the state | राज्यातील पूर परिस्थिती आणि मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राज्यातील पूर परिस्थिती आणि मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Next

मुंबई - राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पुर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदि सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थिती यंत्रणांमार्फत सुरू असलेले मदतकार्य याबाबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेतला. यावेळी  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत पुर परिस्थिती आणि मदत कार्याची  माहिती  घेतली.

कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 22 पथके कार्यरत आहेत. मुख्य सचिवांनी केंद्रीय सुरक्षा सचिवांशी संपर्क साधून डोनिअर विमानाच्या माध्यमातून पुरग्रस्तभागातील नागरिकांना स्थलांतर करण्याची मागणी केली. त्यानुसार आता कार्यवाही सुरू असल्याचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूर मधील 204 गावांना पूराचा फटका बसला आहे. प्रशासनामार्फत सध्या 11 हजार नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी  हलविण्यात आले आहे. आता नौदलाचे बचाव पथक देखील कार्यरत आहे.

सांगली जिल्ह्यात सांगली, पलूस, वाळवा तालुक्यात पूराचा फटका बसला आहे. सुमारे 53 हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील नागरिकांना पुरपरिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. पंढरपूर येथील सुमारे 2000 नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे.

ज्या भागात पुरामुळे लोक अडकले आहेत त्यांना सुरक्षीत ठिकाणी हलवावे आले त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. पुणे जिल्ह्यात शहरासह 64 गावं पूराने प्रभावित झाली असून सुमारे 3343 लोकांना मदत करण्यात आली आहे. पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये गहू आणि तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणं 100 टक्के भरली आहेत.

रायगड जिल्ह्यात 8 तालुके बाधीत असून सरासरीच्या 105 टक्के पाऊस झाला आहे. सुमारे 3000 लोकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिलह्यातील 38 धरणं 100 टक्के भरली आहेत. पुरामुळे 13 गावे बाधीत झाली आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या 50 वर्षांतला सर्वाधिक विसर्ग सोडण्यात आला असून सर्व धरण 80 टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. ठाणे जिल्ह्यात 13 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

राज्यात ज्या ठिकाणी पूर ओसरला तिथे पिण्याचे शुद्ध पाणी, वीज आणि आरोग्य सुविधा तातडीने देण्यासाठी यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. साथ रोगाचा अटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने उपाययोजना अधिक वाढवाव्यात आवश्यकता भासल्यास मुंबई येथून वैद्यकीय पथक देखील पाठविण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पूर ओसरल्यानंतर त्या भागात वीज पुरवठा तातडीने पुर्ववत होणे गरजेचे आहे त्यासाठी अतिरीक्त पथके तैनात करण्याचे निर्देश ऊर्जा विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिले.

धरण क्षेत्रात पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग याबाबत माहिती मिळाल्यास त्या भागातील रेल्वेसेवासाठी उपयुक्त ठरेल अशी सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मांडली होती त्यावर रेल्वेला ही माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यातपूरग्रस्त भागात आरोग्य सुविधेसाठी सुमारे 162 वैद्यकीय पथके कार्यरत असून आवश्यकता भासल्यास अधिकची पथके पाठविण्यात येतील. औषधांचे साठा पुरेसा असून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1007 मिमी असून आतापर्यत सरासरीच्या 685 मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यत प्रत्यक्ष 714.40 मिमी पाऊस झाला आहे.

बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदींसह रेल्वे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधून आपत्कालिन परिस्थीती आणि मदत कार्याची माहिती दिली.

Web Title: Chief Minister reviewed the flood situation and relief work in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.