मुख्यमंत्री घेणार गुन्ह्यांच्या तपासाचा आढावा
By admin | Published: January 7, 2016 02:29 AM2016-01-07T02:29:12+5:302016-01-07T02:29:12+5:30
राज्यातील गुन्ह्यांचा वाढता आलेख, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या, अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याचा तपास, कारागृहांची स्थिती,
पुणे : राज्यातील गुन्ह्यांचा वाढता आलेख, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या, अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याचा तपास, कारागृहांची स्थिती, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया आदींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी पुण्यात आढावा घेणार आहेत. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्यास दुजोरा दिला आहे.
बैठकीला गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, रणजीत पाटील, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासह सर्व पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस दलांचे अधीक्षक, विविध विभागांचे प्रमुख पोलीस अधिकारी, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजय कुमार, कारागृहाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्यायही उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही आढावा बैठक होणार आहे.
मुख्यमंत्री आढावा घेणार असल्याने महासंचालक कार्यालयाने तातडीने सर्व गुन्ह्यांची आकडेवारी मागवून घेतली होती. महिला व दलितांवरील अत्याचार, विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास, नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यावरही चर्चा होईल. गुन्ह्यांची बदलती पद्धत, पोलिसांकडील शस्त्रास्त्रे, पोलिसांच्या घरांचा प्रश्न, उपलब्ध आणि आवश्यक मनुष्यबळ, पदोन्नती याबाबतही बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)