कोरेगाव भीमाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी वेळ मारून नेली , अनिता सावळे यांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 04:43 AM2018-03-31T04:43:37+5:302018-03-31T04:47:16+5:30
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणातील मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार
पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणातील मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार मी मागे घेतलेली नाही. दंगलीतील गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे तक्रारदार अनिता सावळे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात माहिती देताना संबंधित महिलेने तक्रार मागे घेतल्याचे सांगितले होते. याबाबत सावळे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. विशेषत: सरकारने देखील गुन्हे दाखल केलेले आहेत. भिडे यांना २५ मार्चपर्यंत अटक करावे, अन्यथा २६ मार्चला मुंबईत एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाने सरकारला दिला होता. त्यानुसार हे आंदोलन झाले. मात्र, त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी भिडेंना क्लीन चीट दिली. भिडे यांच्या विरोधात पुरावा नाही आणि तक्रार दाखल केलेल्या महिलेने तक्रार मागे घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. दरम्यान, मी तक्रार मागे घेतली नसून संभाजी भिडे यांना दगड मारताना पाहिले, असे मी म्हटलेले नाही. दंगलीच्या ठिकाणी दंगेखोर हे संभाजी भिडे यांचे नाव घेत असल्याचे आम्ही ऐकले आहे, असे अनिता सावळे यांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.
मुख्यमंत्री अशाप्रकारची दिशाभूल कशासाठी करीत आहेत, असा सवाल सत्यशोधन समितीचे डॉ. भारत पाटणकर व ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रा. प्रतिमा परदेशी यांनी विचारला आहे.