मुख्यमंत्र्यांनी मुंढेंना परत बोलवावे, महापौरांची मागणी
By admin | Published: June 29, 2017 03:51 AM2017-06-29T03:51:37+5:302017-06-29T03:51:37+5:30
शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसभाडेवाढ प्रकरणी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीला पुणे महानगर परिवहन निगमचे (पीएमपी) व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आलेच नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसभाडेवाढ प्रकरणी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीला पुणे महानगर परिवहन निगमचे (पीएमपी) व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आलेच नाहीत. त्यामुळे संतप्त महापौर मुक्ता टिळक व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांचा निषेध केला व मुख्यमंत्र्यांकडे त्यांना परत बोलावण्याची मागणी करणार आहे, असे सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसभाडेदरात अचानक वाढ केल्याबाबत तोडगा काढण्यासाठी म्हणून महापौरांनी मुंढे यांना बुधवारी बैठकीसाठी पाचारण केले होते. आयुक्त कुणाल कुमार यांनी मुंढे यांच्याशी चर्चा करून ही वेळ ठरवली होती व तसे सर्वसाधारण सभेत जाहीर केले होते. मात्र, मुंढे या बैठकीला आलेच नाहीत. त्यांनी आपल्या दोन सहायक अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाठविले. आपण कामकाजामुळे येऊ शकत नाही, असा निरोप पाठविला.
त्यामुळे महापौर टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हे पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना परत पाठवून दिले. ‘ज्यांना कसलाही अधिकारी नाही, त्यांच्याबरोबर चर्चा करणार नाही’ असे त्यांनी सांगितले. आयुक्त कुणाल कुमार यांची यामुळे धावपळ उडाली; मात्र त्यांच्याशीही मुंढे यांचा संपर्क होऊ शकला नाही. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर मात्र महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका निश्चित केली व मुंढे यांचा निषेध करण्याचे ठरले.
महापौर टिळक यांनी सांगितले, की मुंढे यांचा हा हटवादीपणा आहे. सर्व पदाधिकारी ४० लाख पुणेकरांचे प्रतिनिधित्व करतात. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न त्यांनी गंभीर वाटत नसेल, तर त्यांची तपासणीच केली पाहिजे. पीएमपीमध्ये महापालिकेचे ६० टक्के भागभांडवल आहे. दर वर्षी कोट्यवधी रुपयांची मदत केली जाते. तरीही ते असे वागत असतील, तर त्यांची गरज नाही, असे मत सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांकडे भाजपानेच मुंढे यांच्या नियुक्तीची मागणी केली होती, असे लक्षात आणून दिले असता महापौरांनी ‘ते चांगले
काम करतील अशी आशा होती,’ असे स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या या हटवादीपणामुळे ते कितीही चांगले काम करीत असतील तरीही त्यांचा उपयोग नाही, असे त्या म्हणाल्या. मुंढे यांना परत बोलवावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात लवकरच त्यांना पत्र सविस्तर पत्र लिहिणार आहे, असे टिळक यांनी सांगितले.