मुख्यमंत्र्यांनी विष्णू सवरांची हकालपट्टी करावी: राधाकृष्ण विखे-पाटील
By Admin | Published: September 16, 2016 05:10 PM2016-09-16T17:10:50+5:302016-09-16T17:10:50+5:30
आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी स्वतः राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली
ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.16- आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी स्वतः राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात कुपोषणामुळे लहान मुलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावरून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थेट मंत्री विष्णू सवरांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विष्णू सवरांना बडतर्फ न करता त्यांची हकालपट्टीच करावी. त्यांना बडतर्फ करणं कमी आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळांना हाकलून दिलं पाहिजे.’ तसेच कुपोषणवाढीस हे सरकारच जबाबदार आहे असं म्हणत विखे-पाटलांनी सरकारवर जोरदार टीका केली.
पालघर जिल्ह्यात 7 हजार कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल 600 मुलांचा कुपोषणामुळे बळी गेला आहे.
दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी मोखाडा तालुक्यात सागर वाघ या अवघ्या दीड वर्षाच्या मुलाचा कुपोषणानं मृत्यू झाला होता. घटनेला पंधरा दिवस उलटले तरीही पालकमंत्री मोखाड्यात न आल्याने स्थानिकांमध्ये असंतोष खदखदत होता. पालकमंत्री विष्णु सवरा यांना तब्बल 15 दिवसांनंतर पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. अखेर काल मंत्री पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेले असता मयत मुलगा सागर वाघच्या आईनं विष्णु सवरा यांना दारातूनच परतावून लावलं होतं.