‘इंदू सरकार’ प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा - विखे पाटील

By Admin | Published: July 8, 2017 04:40 PM2017-07-08T16:40:57+5:302017-07-08T16:40:57+5:30

मधूर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या‘इंदू सरकार’ चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे

Chief Minister should intervene in 'Indu Government' case - Vikhe Patil | ‘इंदू सरकार’ प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा - विखे पाटील

‘इंदू सरकार’ प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा - विखे पाटील

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - मधूर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या‘इंदू सरकार’ चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
 
आपल्या पत्रात विखे पाटील यांनी नमूद केले आहे की, या चित्रपटाची कथा दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी आणि काँग्रेस नेते स्व. संजय गांधी यांच्या जीवनाशी संबंधीत असल्याचे दिसून येते. परंतु, सदरहू चित्रपटामध्ये वस्तुस्थितीशी विसंगत अशा पद्धतीने काही घटनांचे सादरीकरण असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्याची शंका खरी ठरली तर प्रेक्षकांच्या भावना दुखावून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात. त्याचप्रमाणे वस्तुस्थितीशी छेडछाड करून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्व. संजय गांधी यांची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करू शकतात. या पार्श्वभूमिवर संभाव्य वाद टाळण्याच्या हेतूने प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट संबंधितांना दाखविण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करावा; जेणेकरून संभाव्य अप्रिय घटना टाळता येतील, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
 
आणखी वाचा - 
"इंदू सरकार" आधी आम्हाला दाखवा, काँग्रेसचं सेन्सॉर बोर्डाला पत्र
‘इंदू सरकार’चे प्रदर्शन लांबणीवर!
 
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनीही चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्र लिहून आक्षेप व्यक्त करत चित्रपट दाखवण्याची मागणी केली आहे.
 
याआधी प्रिया सिंग पॉल यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. "या चित्रपटात इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या सिनेमावर बंदी आणावी", अशी मागणी प्रिया सिंग पॉल यांनी केली आहे. यानंतर ‘इंदू सरकार’ सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. 
 
 प्रिया सिंग पॉल यांनी विरोध केल्याने एक वेगळाच मुद्दा आता चर्चेला आला आहे. कारण प्रिया सिंग पॉल कोण आहेत याची माहिती घेत असताना त्यांनी आपण संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा केला आहे. प्रिया सिंग पॉल यांनी नोटीस पाठवताना आपण संजय गांधी यांची मुलगी असल्याचा उल्लेखच केला आहे.
 
या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.  28 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होईल.

Web Title: Chief Minister should intervene in 'Indu Government' case - Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.