"मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीनं इतर झेंडा घेऊन बसूनच नये"; तिरंग्याच्या बरोबरीतील भगव्या झेंड्याबद्दल विनंतीवजा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 05:48 PM2021-08-09T17:48:11+5:302021-08-09T17:51:44+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला केलं संबोधित. संबोधनादरम्यान त्यांच्या डाव्या बाजूला तिरंगा, तर उजव्या बाजूला होता भगवा झेंडा.
रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या आणि अन्य मुद्द्यांवर राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी राज्यातील पूरपरिस्थिती, कोरोनाची स्थिती आणि अन्य बाबीबद्दल राज्यातील जनतेला माहिती दिली. परंतु यावेळी मुख्यमंत्र्यांच्या एका बाजूला तिरंगा ध्वज तर दुसऱ्या बाजूला भगवा ध्वज होता. या दोन्ही ध्वजांच्या उंचीवरून आता चर्चा सुरू झाली आहे. मानवाधिकार कार्यकर्ते असीम सरोदे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तसंच त्यांनी त्याद्वारे मुख्यमंत्र्यांकडे विनंतीवजा आक्षेपही नोंदवला आहे.
Mumbai local train services to start from August 15 for people who have taken both the doses of COVID19 vaccine: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray pic.twitter.com/DCdvrnA2WO
— ANI (@ANI) August 8, 2021
"भारताच्या तिरंगा झेंड्याच्या वरच्या पातळीवर तसेच बरोबरीने इतर कोणताही झेंडा असू नये हा साधा नियम पाळावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती. खरे तर मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीने इतर झेंडा घेऊन बसूच नये. दुर्दैव आहे भारतीय लोकशाहीचे की आज आपल्या देशात राष्ट्रध्वज केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला उत्सवी स्वरूपात मिरविण्याच्या कामाचे राहिले आहेत की काय असा प्रश्न पडतो. अनेकांसाठी त्यांचे राजकीय पक्षांचे ध्वज व धर्मध्वजच महत्त्वाचे आहेत," असं सरोदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
"इतर कोणातच ध्वज महत्त्वाचा नसलेले भारतीय नागरिकच या देशाला अखंड ठेवतील. लोकशाही अशाच नागरिकांच्या व नेत्यांच्या शोधात आहे. भारतीय ध्वज संहिता indian flag code सगळ्यांनी वाचवा, तसेच याबाबतच्या नियमांची माहिती घ्यावी," असंही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केलं आहे.