मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी; न्यायालयाचे ताशेरे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 01:20 AM2019-03-30T01:20:18+5:302019-03-30T01:20:33+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात गृहखात्याने दाखवलेल्या दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर गंभीर ताशेरे ओढल्याने राज्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे.
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात गृहखात्याने दाखवलेल्या दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर गंभीर ताशेरे ओढल्याने राज्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री हे पूर्णपणे अपयशी व कार्यक्षम ठरले आहेत. फडणवीस हे संविधानाप्रमाणे नाही तर संघाच्या विचारधारेनुसार काम करत आहेत. संघ विचारधारा ही कायम संविधान विरोधी राहिलेली आहे. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हे कायम संघ विचारधारेच्या विरोधात लढले. त्यामुळेच त्यांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यात सरकारला रस नाही, असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.
नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी तपासाचे धागेदारे संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या बड्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पंतप्रधानांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक तपास मंद करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला दिले, असा आरोप इंडिया स्कूप नावाच्या वेबसाईटने केला आहे. यासंदर्भात काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरणही मागितले होते; मात्र त्यांनी आजवर ते दिले नाही, असेही चव्हाण म्हणाले.