मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - पुणे काँग्रेस
By admin | Published: May 18, 2014 02:07 PM2014-05-18T14:07:46+5:302014-05-18T14:07:59+5:30
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुण्यातील काँग्रेस पदाधिका-यांनी केली आहे.
ऑनलाइन टीम
पुणे, दि. १८ - लोकसभा निवडणुकीत राज्यातील काँग्रेसच्या पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडण्याचे 'उद्योग' काँग्रेसच्याच पदाधिका-यांकडून सुरु आहेत. पुण्यातील काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पक्षाच्या बैठकीत केली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या तडाख्यामुळे देशभरात काँग्रेसची वाताहत झाली असून महाराष्ट्रही यातून सुटू शकलेले नाही. राज्यातून काँग्रेसचे अवघे दोनच खासदार निवडून आले आहेत. राज्यातील या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पुण्यातील शहर पदाधिका-यांच्या बैठकीत हा वाद उघडपणे दिसून आला आहे. 'बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा' अशी मागणी पुण्यातील काँग्रसचे शहर उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास हा विरोध आणखी तीव्र करु असा इशाराच मानकर यांनी दिला आहे. राज्याच्या नेतृत्वाने आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे असेही मानकर यांनी सांगितले.या बैठकीला पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदमही उपस्थित होते.