मुख्यमंत्र्यांनी सांगली प्रकरण गंभीरपणे घ्यावे: पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:47 AM2017-11-14T02:47:56+5:302017-11-14T02:48:30+5:30
अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत केलेला खून आहे, की सुपारी घेऊन पोलिसांनी केलेला एन्काऊंटर आहे, याविषयीची शंका उपस्थित होत आहे.
सांगली : अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत केलेला खून आहे, की सुपारी घेऊन पोलिसांनी केलेला एन्काऊंटर आहे, याविषयीची शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी गंभीरपणे पाहावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
चव्हाण यांनी सोमवारी सकाळी आमदार डॉ. पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्यासह कोथळे याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याप्रकरणी राज्य व केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
या घटनेला जबाबदार धरत सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व शहर पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे.
सांगलीत कडकडीत बंद, दोन बसेसवर दगडफेक
अनिकेतच्या मृत्यूप्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीने पुकारलेल्या सांगली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समितीने शहरातून मोटारसायकल रॅलीही काढली. दोन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली, तर एका ठिकाणी टायर पेटवून रस्त्यावर टाकण्यात आला.
सोलापूर बंदला अल्प प्रतिसाद
सोलापूर विद्यापीठाचे नामकरण शिवयोगी सिद्धेश्वर विद्यापीठ करण्याऐवजी अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ करण्याचा मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात शिवा संघटनेने सोमवारी पुकारलेल्या सोलापूर बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. येत्या १८ डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी सांगितले.