मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत जाहीर करावी : ॲड. प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 01:21 PM2020-10-17T13:21:26+5:302020-10-17T13:34:26+5:30
राज्यात परतीच्या पावसाने पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे
पुणे : राज्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले असून नदी-नाल्यांना देखील पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी शेत पिकांचे, व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच यात अनेक नागरिक, जनावरांचा मृत्यू झाला. सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून काढणीसाठी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करावा, जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
राज्यात परतीच्या पावसाने पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे कर्जबाजारी असलेला शेतकरी हताश झाला असून तो आता सरकारच्या मदतीची अपेक्षा करत आहे. त्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थिती असलेल्या भागाचा दौरा करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी
डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमबरोबर बैठक आयोजित करून जी काही मदत देता येईल येईल त्याची तात्काळ घोषणा करावी ही मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे, अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.
...........
अतिवृष्टीचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला; 87 हजार 416 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा अंदाज
पुणे विभागात बुधवारी (दि.14) रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 87 हजार 416 हेक्टर वरील शेत पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. यामध्ये सर्वाधिक 58 हजार पेक्षा अधिक क्षेत्र एकट्या सोलापूर जिल्ह्यातील तर पुणे जिल्ह्यात 18 हजार 746 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय 8 व्यक्ती मयत झाल्या असून, तब्बल 1 हजार 21 जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. या अतिवृष्टीमुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून, तब्बल 3 हजार 156 घरांची पडझड झाली असून, 100 झोपड्या देखील पडल्या आहेत.