मराठा समाज मोर्चेकऱ्यांशी मुख्यमंत्री करणार चर्चा
By admin | Published: September 6, 2016 04:40 AM2016-09-06T04:40:34+5:302016-09-06T05:00:42+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेणार आहेत
यदु जोशी,
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेणार आहेत. चालू महिन्याअखेर ही चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आज गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी अमृता यांनी पूजन केले. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री सरिता, कन्या दिविजा आणि इतर कुटुंबीय भक्तिरंगात रंगले होते. गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे सध्या निघत आहेत. मोर्चाच्या वतीने स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली जात आहेत. एकूण २० ठिकाणी मोर्चे निघणार असल्याची आमची माहिती आहे. या मोर्चांनंतर मोर्चांच्या प्रतिनिधींशी मी स्वत: चर्चा करेल.
या मोर्चांचे नेते म्हणून कोणीही समोर येताना दिसत नाही. त्यातही राजकीय नेत्यांना मोर्चेकऱ्यांनीच दोन हात दूर ठेवले आहे. अशावेळी सरकार नेमके कोणाशी चर्चा करणार या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की जिल्ह्याजिल्ह्यात या मोर्चाचे आयोजक कोण आहेत, त्यांच्या संघटना कोणत्या याची माहिती सरकारकडे आहे. त्या आधारावरच चर्चा केली जाईल. चर्चेपासून राजकीय पक्षांच्या नेत्यांना दूर ठेवले जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा, कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागण्या सध्या विशाल मोर्चांद्वारे केल्या जात आहेत. या मोर्चांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार न होता अतिशय शांततामय पद्धतीने ते निघत आहेत. सूत्रांनी सांगितले की विशेषत: अॅट्रॉसिटीच्या कायद्यासंदर्भात मराठा समाजामध्ये असलेली अस्वस्थता दूर करताना दलित समाजालाही विश्वासात घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. या संवेदनशील विषयाचा राजकीय फायदा कोणालाही उचलू न देण्याची दक्षताही त्याचवेळी घेतली जाईल.
>दलित समाजाचेही मोर्चे
अॅट्रॉसिटीच्या कायद्याला सरकारने धक्काही लावू नये या मागणीसाठी दलित समाजाचे मोर्चे काढण्याचे नियोजन सुरू झाले आहे. परभणीमध्ये काल या संदर्भात एक मोठी बैठक झाली. मराठवाड्यात इतरत्रही बैठकी घेऊन मोर्चांचे आयोजन करण्याचे ठरले. या मोर्चांपासूनही दलित समाजातील प्रस्थापित नेत्यांना बाजूला ठेवले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी आज लोकमतला दिली.