सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्री ताटकाळत थांबले
By admin | Published: July 14, 2016 06:48 PM2016-07-14T18:48:56+5:302016-07-14T18:48:56+5:30
साहेब ! बाहेर शेतकरी आलेत. त्यांचे काही प्रश्न आहेत.तुम्हाला भेटायंच म्हणतात़़. त्यांना बोलावू का? असे प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारताच
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर, दि. १४ - साहेब ! बाहेर शेतकरी आलेत. त्यांचे काही प्रश्न आहेत.तुम्हाला भेटायंच म्हणतात़़. त्यांना बोलावू का? असे प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ हो म्हणत, चला भेटूयात म्हणत मुख्यमंत्री धावपट्टीवरून चालत मुख्य कार्यालयापर्यंत आले, पण़ शेतकरी गायब़़ पुन्हा मुख्यमंत्री म्हणाले, कुठे आहेत शेतकरी ? बोलवा त्यांना़ अखेर शेतकरी न आल्याने मुख्यमंत्री १५ ते २० मिनीट ताटकत थांबले !
घडलेला प्रकार असा की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरातील आषाढी वारीच्या महापुजेसाठी सहपरिवार गुरुवारी सोलापुरातील विमानतळावर दाखल झाले़ मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडाव्यात म्हणून काही शेतकरी विमानतळावर आले होते़ आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे तसा निरोप तरी द्या अशी हाक शेतकऱ्यांनी प्रांताधिकासमोर मांडली़ यावेळी प्रांताधिकारी पवार यांनी ठीक आहे मी मुख्यमंत्र्यांना निरोप देतो त्यांनी जर वेळ दिला तर भेट होईल अन्यथा नाही असेही प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले़ यानंतर काही वेळाने मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर आगमन होताच उपस्थित मान्यवरांनी मुख्यमंत्र्याचे स्वागत केले़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांचा तो निरोप पोहचविला़ या निरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी कशाचाही विचार न करता तत्काळ शेतकऱ्यांना भेटण्यासाठी होकार दिला व पायी चालत ते विमान प्राधिकरण कार्यालयाकडे निघाले़ यावेळी शेतकऱ्यांना लवकर बोलवा़ मुख्यमंत्री पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हटले़. यानंतर काही वेळाने प्रभारी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी साहेब ! शेतकरी बाहेर नाहीत, असा निरोप दिला़ त्यानंतर मुख्यमंत्री निराश होऊन परतले़
यावेळी प्रभारी पोलीस आयुक्त दिपक पांडे, सहा़ पोलीस उपायुक्त अर्पणा गिते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, प्रांताधिकारी शहाजी पवार, तहसिलदार समाधान शेंडगे, मनपा उपायुक्त अजित साठे आदी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़
प्रांतधिकारी शहाजी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती दिली़ खरेच शेतकरी आले होते गेले कुठे़़़जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या समन्वयाअभावी मुख्यमंत्री फडणवीस यांना ताटकाळत उभे रहावे लागले़ ही गोष्ट चुकीची आहे़
-शहाजी पवार
भाजपा जिल्हाध्यक्ष, सोलापूऱ
शेतकऱ्यांचे प्रश्न व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी धावपट्टी सोडून काही अंतर चालत आले होते़ प्रचंड पोलीस बंदोबस्त व वेळ कमी असतानाही शेतकऱ्यांना भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनाच्या समन्वयाचा अभावामुळे परत निघून जावे लागले़
-अशोक निंबर्गी
भाजपा, शहराध्यक्ष, सोलापूर शहऱ
काही नाही शेतकरी विविध विषयांवर बोलणार होते़ ते येथे आलेही होते़ त्यामुळेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसा निरोप दिला होता़ पण शेतकरी गायब कधी झाले हे कळलेच नाही़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांची व शेतकऱ्यांची भेट होऊ शकली नाही़
-शहाजी पवार
प्रांताधिकारी, सोलापूऱ
संतप्त शेतकरी निघून गेले.
सोलापूर दुष्काळी जिल्हा़ तीन नक्षत्रे कोरडी गेली़ खरीप हंगामही वाया गेला़ फळबागा जळून गेल्या, अशा स्थिती आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांना मुंबईत जाऊन मांडू शकत नाही, तेच सोलापुरात येणार ही माहिती मिळताच शेतकरी त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर आले होते़ मात्र पोलिसांनी बंदोबस्ताचे कारण पुढे करीत अक्षरश: त्ऱ्यांना तेथून पिटाळून लावले़ शेतकरी संतापाने निघून गेले़.