मुख्यमंत्री ठाकरे सगळ्यांना सोबत घेऊन जात आहेत- बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 04:10 AM2020-03-06T04:10:26+5:302020-03-06T07:23:03+5:30

नवे घर लावताना सुरुवातीला काही काळ भांड्याला भांडे लागतेच. याचा अर्थ लगेच तीन पक्षात वाद आहेत असा होत नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्याशी झालेली ही बातचित.

Chief Minister Thackeray is taking everyone along - Balasaheb Thorat | मुख्यमंत्री ठाकरे सगळ्यांना सोबत घेऊन जात आहेत- बाळासाहेब थोरात

मुख्यमंत्री ठाकरे सगळ्यांना सोबत घेऊन जात आहेत- बाळासाहेब थोरात

Next

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांना सोबत घेऊन काम करत आहेत. विषय समजून ते त्यावर भाष्य करतात. प्रशासनाच्या कामात ते कुठेही नवखे आहेत असे वाटत नाही. नवीन सरकार आहे, नवे घर लावताना सुरुवातीला काही काळ भांड्याला भांडे लागतेच. याचा अर्थ लगेच तीन पक्षात वाद आहेत असा होत नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्याशी झालेली ही बातचित.
हे सरकार पाच वर्षे टिकणार हे तुम्ही कशाच्या भरवश्यावर म्हणता?
याच १०० दिवसात आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समित्या, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका एकत्र लढलो आणि सगळ्या ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झाला. एवढे एकच उदाहरण हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल यासाठी पुरेसे बोलके आहे. भाजप आता सत्ता नसल्याने अस्वस्थ आहे. त्यांना काही काम उरले नाही, त्यामुळे ते सतत आमच्यात विसंवाद असल्याच्या बातम्या पेरण्याचे काम करत आहे.
या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. या काळात तुम्हाला जे अपेक्षित होते ते पूर्ण होत आहे का?
आम्ही विरोधी पक्षनेता ही बनवू शकणार नाहीत अशी भाषा भाजपची होती. त्यातून आम्ही सत्तेत आलो, १०० दिवस पूर्ण केले, त्यामुळे खरे तर हा प्रश्न आता विरोधांना विचारला पाहिजे. राहता राहीला आमचा विषय, तर आम्ही किमान समान कार्यक्रमानुसार काम करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेऊन तो अंमलातही आणला आहे, एवढ्या वेगाने तर भाजपने जाहीर केलेली कर्जमाफीही अंमलात आली नव्हती. ही तर सुरुवात आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीचे मंत्री वेगवेगळी विधाने करतात, त्यावर शिवसेना नेते म्हणून तुमची प्रतिक्रिया काय असते?
हे तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांनी जबाबदारीने विधाने केली पाहिजेत. वादाचे विषय टाळले पाहिजेत. स्वत:ला श्रेय मिळवण्यापेक्षा सरकारला यश कसे मिळेल हे पाहिले पाहिजे. सरकार चांगले चालणे हे सगळ्यांचे प्राधान्य असावे. श्रेयवाद करु नये. श्रध्दा आणि सबुरी यावर विश्वास ठेवला पाहिजे. हा सल्ला आमच्याच पक्षातल्या नाही तर तीनही पक्षाच्या नेत्यांना आहे आणि सगळेच समंजस नेते असल्याने वाद नाहीत.
शिवसेनेसोबत आपण सत्तेत येऊ असे कधी वाटले होते का? विरोधात असतानाचा व आता सत्तेत असणारी शिवसेना यावर काय सांगाल?
शिवसेना म्हणजे भाजप नाही हे आम्हाला चांगले माहिती आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्व. इंदिरा गांधी यांना समर्थन दिले होते. राष्टÑपतीपदाच्या वेळीही त्यांनी काँग्रेसला साथ दिली होती. आता त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही साथ दिली आहे. उध्दव ठाकरे अत्यंत ‘पॉझिटिव्ह’ आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा सतत आग्रह दिसून येतो. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना ते भेटून आले. शिवसेनेसोबत काम करताना आम्हाला खूप चांगला अनूभव येत आहे.
राष्टÑवादी पक्ष सरकारमध्ये वरचढ आणि काँग्रेस दुय्यमस्थानी आहे असे वाटते का?
त्यांच्याकडे मोठी टीम होती. आमच्याकडे मी, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार असे मोजकेच लोक राज्यभर फिरत होतो. सरकारच येणार नाही असे म्हणत असताना आम्ही सत्तेवर आलो. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते सरकारसाठी मोठी भूमिका बजावत आहेत. त्यामुळे आमच्यात कोणतेही वाद नाहीत.

Web Title: Chief Minister Thackeray is taking everyone along - Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.