सरकारी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले
By admin | Published: November 20, 2015 01:39 AM2015-11-20T01:39:56+5:302015-11-20T01:39:56+5:30
अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध बैठकांमधून अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी झाडाझडती घेतली.
- अतुल कुलकर्णी, मुंबई
अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध बैठकांमधून अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी झाडाझडती घेतली. मुख्यमंत्र्यांचा नूर पाहून जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनीही अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. कामे करायची नसतील तर फाईलवर तसे स्पष्ट लिहा; पण जागा अडकवून ठेवू नका, या शब्दात दोघांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
जलसंपदा विभागाच्या कामांचा जानेवारी महिन्यात आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी कोणती कामे कधी पूर्ण होणार, कोण कसे काम करणार, याची विस्ताराने चर्चा झाली होती. त्याचे पुढे काय झाले? जानेवारीत आपण जेथे होतो तेथेच आजही आहोत. या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. एखादे काम करायचे नसेल तर फाईलवर तुम्हाला जे वाटते ते स्पष्ट लिहा, पण कामे अडवून ठेवणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
पोलिसांसाठी बांधायच्या घरांसाठीची बैठकही आज झाली. त्यावेळी पोलीस हाऊसिंगच्या बाबतीत काहीही घडत नाही, १ लाख घरे बांधायची असताना एक हजार घरांचा कसला प्रस्ताव घेऊन येता, हजार दोन हजार घरांनी काय होणार आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. काही अधिकाऱ्यांनी जलसंपदा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यास दहा महिने लागले, असा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यावर ज्यांना मान्यता होत्या त्या प्रकल्पांचे किती काम पुढे नेले गेले, कामे करण्याच्या बाबतीत नकारात्मक भूमिका बदला, अशा शब्दात महाजन यांनीही सुनावले.
प्रस्ताव कागदावर विषयांचा खेळखंडोबा
राज्य जल परिषद, जलसंपदा विभागाच्या कामांचा आढावा आणि पोलीस गृहनिर्माण अशा विविध विषयांवरील बैठका आज मुख्यमंत्र्यांनी घेतल्या. गेल्या वर्षभरात काहीही विशेष घडले नाही. प्रस्ताव पुढे सरकतच नाहीत, सगळ्या गोष्टी कागदावरच आहेत. सगळ्या विषयांचा पुरता खेळखंडोबा करून टाकला आहे. आम्ही लोकांना काय सांगायचे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी खडसावले.