मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच देणार औरंगाबादकरांना सरप्राईज; चंद्रकांत खैरेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 03:48 PM2020-02-14T15:48:18+5:302020-02-14T15:49:55+5:30
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी १९८८ मध्ये मागणी केली होती.
औरंगाबाद - औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनेची मागणी होती. संभाजीनगर नावाची मागणी मनसे करतेय त्यांनी हा मुद्दा टिकवला पाहिजे. कारण त्यांची धरसोडवृत्ती सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना लवकरच सरप्राईज देतील. मनसे आता बोलायला लागली आहे. आम्ही आधीपासून संभाजीनगर बोलतो. आता अधिकृतपणे मुख्यमंत्री निर्णय घेतील असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
याबाबत एबीपी माझाशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी १९८८ मध्ये मागणी केली होती. अनेकदा आम्ही विरोधात असताना याबाबत पत्रव्यवहार केला होता. यूपीत योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज नाव केलं होतं त्यावेळी लोकसभेतही मी हा प्रश्न विचारला होता. पण त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं नाही. आता ठाकरे सरकार आहे त्यामुळे लवकरात लवकर संभाजीनगर नाव होऊ शकतं. गेल्या २ महिन्यापासून औरंगाबादचं नाव बदलण्याची तयारी सुरु आहे असं त्यांनी सांगितले.
औरंगाबाद की संभाजीनगर?; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक लोक संभाजी महाराजांना मानतात, त्यामुळे औरंगाबादचं संभाजीनगर करण्यास त्यांचा विरोध नसेल, काँग्रेसचे लोक त्यांचे मुद्दे मांडतात आमचीही भूमिका आम्ही मांडतोय. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन पूर्ण केलं. त्यामुळे औरंगाबादचं नावही संभाजीनगर लवकर होईल असं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे.
राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना नामकरणाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत असं सांगत शिवसेनेला टोला लगावला. त्यामुळे आगामी काळात औरंगाबादचं संभाजीनगर नाव करण्यासाठी मनसे आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचंही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं.
दरम्यान, मागच्या ५ वर्षात शिवसेना सत्तेत होती, आताही सत्तेत आहे पण औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची हिंमत झाली नाही आणि आम्ही त्याचा उच्चार केला तर त्याची एवढी धास्ती घेतली असा टोला मनसेने शिवसेनेला लगावला आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद नामांतराचा प्रश्न निकाली लागणार का हे पाहणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
हिंदूजननायक' उपाधीवर राज ठाकरेंनी हातच जोडले, जरा चिडूनच म्हणाले...
राज ठाकरे मराठवाडा दौरा अर्धवट सोडणार; उद्या मुंबईत परतणार
...तेव्हा कुठे होते हे तथाकथित हिंदुत्ववादी?; राज ठाकरेंची शिवसेनेला चपराक
'लाव रे तो व्हिडीओ'मधून पुलवामा हल्ल्यावर शंका घेणारे राज ठाकरे आता म्हणतात...