आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची दखल घ्या; उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 05:39 PM2021-12-18T17:39:00+5:302021-12-18T17:41:56+5:30

Chief Minister Uddhav Thackeray : गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Chief Minister Uddhav Thackeray reaction on Bengluru incident of Shivaji Maharaj Statue, appeals to Prime Minister Narendra Modi  | आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची दखल घ्या; उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना आवाहन

आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची दखल घ्या; उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना आवाहन

googlenewsNext

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका. गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते, आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवते बदलत नाहीत. हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत व या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे. बेळगावात मराठी भाषिकांच्या गळचेपी करायची. सनदशीर मार्गाने सीमाप्रश्नी लढा देत असलेल्या मराठी भाषिकांवर कन्नड कर्मठांकडून हल्ला करायचे. असे भ्याड प्रकार थांबविण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे चालणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

याचबरोबर, छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवताचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. मराठी अस्मितेला डिवचणे परवडणारे नाही हे ध्यानात घ्यावे. यात केंद्र सरकारनेही दुतोंडी भूमिका सोडून ठोस पावले उचलावी, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray reaction on Bengluru incident of Shivaji Maharaj Statue, appeals to Prime Minister Narendra Modi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.