मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 03:24 PM2019-12-24T15:24:34+5:302019-12-24T15:30:43+5:30
अभिजात भाषेचा दर्जा मिळणेबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तेजस समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला. तर अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पूर्ण करते. मात्र अभिजात भाषेचा दर्जा मिळणेबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
#मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना पत्राद्वारे विनंती pic.twitter.com/YHBXTwqnle
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 24, 2019
तसेच संबंधित विभागाने सादर प्रकरण साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे कळविले आहे. बराच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.