Uddhav Thackeray : "सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका", एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कळकळीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 02:18 PM2021-11-10T14:18:24+5:302021-11-10T14:19:21+5:30

ST Workers Strike : दोन वर्षांपासून या विषाणूचा  मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray urges ST workers not to agitation | Uddhav Thackeray : "सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका", एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कळकळीचे आवाहन

Uddhav Thackeray : "सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका", एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कळकळीचे आवाहन

googlenewsNext

मुंबई : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने संपकरी आंदोलकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असले तरी एसटीतील कामगार संघटनांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. एसटी महामंडळाने कारवाई केली तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचे कामगार संघटनांनी म्हटले.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असे आवाहन संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केले आहे".  
 
अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा  मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

याचबरोबर,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय पक्षांनाही विनंती केली आहे. ते म्हणाले, "राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या."

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray urges ST workers not to agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.